लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी विद्यापीठ प्रशासनाकडून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान, ही बाब शक्य नसल्यास रोटरी क्लब तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटी येथे विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्रपणे विनामूल्य लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचीही मागणी विद्यापीठाने केली आहे.
जळगाव, धुळे व नंदुरबार हे तिन्ही जिल्हे मिळून विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असून, ह्या तिन्ही जिल्ह्यांतील महाविद्यालयातून विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कार्यालयीन कामकाजासाठी मोठ्या प्रमाणात विद्यापीठात ये-जा करीत असतात. सद्य:स्थितीत परीक्षेचे कामकाज सुरू असून, अशा कठीण परिस्थितीतदेखील अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत. विद्यापीठात सुमारे ५५० ते ६०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील बहुतांश कर्मचारी जळगाव शहरातून तसेच काही कर्मचारी धुळे व भुसावळ येथून रोज ये-जा करीत असतात. आतापर्यंत विद्यापीठात ५० ते ६० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर दाेन कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी विद्यापीठाकडून करण्यात आली आहे. या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी यांच्यासह महानगरपालिका आयुक्तांनाही पाठविण्यात आले आहे.
अँटिजेन चाचणी व्हावी
काही दिवसांपूर्वी धरणगाव आरोग्याधिकाऱ्यांच्या पथकाकडून विद्यापीठातील १९२ कर्मचाऱ्यांची अँटिजेन तपासणी करण्यात आली होती. त्यात पाच कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले होते. अजूनही शेकडो कर्मचाऱ्यांची चाचणी होणे बाकी आहे. त्यामुळे सोमवारी विद्यापीठात पुन्हा स्राव कॅम्प घेऊन कर्मचाऱ्यांची अँटिजेन चाचणी करण्यात यावी, अशीही मागणी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.