लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महिलांनी कधी लस घ्यावी, कधी घेऊ नये, मासिक पाळीत लस घेऊ नये किंवा घ्यावी, याबाबत बरेच गैरसमज समाजमाध्यमांवर फिरत आहेत. मात्र, मासिक पाळीवर लसीकरणाचा कुठलाही परिणाम होत नाही, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी स्पष्ट केले आहे. स्त्री आरोग्य आणि लसीकरण याबाबत त्यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली आहे.
महिलांनी नोंदणीकृत दिवशी लस घ्यावी. मग ही तारीख मासिक पाळीमध्ये, पाळीपूर्वी, पाळीनंतर असली तरी हरकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार गरोदरपणात लसीकरण करता येत नाही. इंग्लंड, अमेरिका या देशांमध्ये गरोदर महिलांना लसीकरण केले गेले आहे. लसीकरणामुळे गर्भाला व्यंग असल्याचे निदर्शनात आले नाही. गरोदरपणात लसीकरणामुळे गर्भातील बाळाला देखील अँटीबॉडीज मिळतात. अजून काही संशोधनानंतर आपल्या देशातही गरोदरपणात लसीकरणाला मान्यतेची शक्यता नाकारता येत नाही.
लस कुणी घ्यावी, कुणी घेऊ नये
१) अपत्याचे नियोजन असलेल्या जोडप्यांनी देखील लसीकरण करून घेण्यास हरकत नाही; पण लगेच एक ते दोन आठवड्यात टेस्ट ट्यूब बेबीच्या तयारीत असलेल्या जोडप्यांनी लसीकरण टाळावे.
२) लस घेतल्यानंतर गरोदरपणाचे निदान झाल्यास गरोदरपणाचे उपचार करावे. गर्भाला काहीही धोका होत नाही. त्यामुळे गर्भपात करण्याची गरज नाही. तसा विचारही मनात आणू नये. दुसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस घेऊ नये.
३) प्रसूतीनंतर स्तनपानामुळे लस घेऊ नये, असे यंत्रणेचे निर्देश आहेत; पण पाश्चात्त्य देशात स्तनदा मातांना लस दिली जात आहे. स्तनपानाद्वारे अँटीबॉडीज बाळाला मिळतात. आपल्या देशात देखील याबाबत संशोधन होत असल्याने आपल्याकडेही चित्र बदलू शकते.
४) पीसीओडी, अंडाशयाच्या गाठी, मधुमेह, गर्भपिशवीच्या गाठी, रक्तदाब यातही लसीकरण सुरक्षित असल्याचे डॉ. बनसोडे यांनी सांगितले.
लस ही परिणामकारच
१) काेव्हिशिल्ड तसेच कोव्हॅक्सिन या दोन्ही प्रकारच्या लसी सारख्याच प्रमाणात उपयुक्त आहेत; पण लसीकरणात पहिला व दुसरा म्हणजेच बूस्टर डोस एकाच प्रकारच्या लसीचा असणे आवश्यक आहे. ताप येणे, थंडी वाजणे, डोके दुखणे, अंग दुखणे, जुलाब होणे हे दुष्परिणाम सौम्य प्रमाणात होऊ शकतात; पण सकारात्मक दृष्टिकोन व मानसिक तयारी यामुळे या दुष्परिणामांवर मात करता येते. आवश्यकता भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
२) लसीकरणमुळे मृत्यू होत नाही. ज्या तुरळक मृत्यूंची नोंद झाली आहे, त्या रुग्णांना पूर्वीपासून इतर व्याधी होत्या. हा योगायोगाचा भाग आहे
३) दुष्परिणाम जाणवल्यास लस ही परिणामकारक आहे ही धारणा देखील चुकीची आहे. दुष्परिणाम झाले अथवा नाही झाले तरीही लस ही परिणामकारकच असल्याचे डॉ. बनसोडे यांनी म्हटले आहे.