अमळनेर/ चोपडा / पारोळा : अनेर- बोरी परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून लसीकरण ठप्प झाले आहे. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेकजण सकाळपासून रांगा लावतात. मग दोन तासांनी त्यांना आज लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.
पारोळा
पारोळा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून लसींचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद आहे. डेल्टा प्लसचा धोका वाढणार असल्याने नागरिक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात केंद्रावर गर्दी करीत असल्याचे चित्र आहे. पण आठवड्यात फक्त ३ ते ४ दिवसच लसीकरण तेवढे सुरू असते. अजूनही शहरासह ग्रामीण भागात लसीकरण पाहिजे तेवढ्या प्रमाणात झालेले नाही. लसीकरण जर नियमित सुरू राहिले तर लसीकरणाचा टक्का वाढेल.
प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय झालेले लसीकरण प्राथमिक आरोग्य केंद्राची नावे झालेले लसीकरण
१) पारोळा ११,०३१
२)मंगरूळ ३७५४
३)शिरसोदे ५३७४
४) तामसवाडी ४३९४
५) शेळावे ४१८१
--------------
एकूण- २८,७४४
चोपडा येथे दोन दिवसांपासून लस मिळेना!
चोपडा तालुक्यात आठ केंद्रांवर कोरोना लसीकरण गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. या आठ केंद्रांमध्ये चोपडा शहरात उपजिल्हा रुग्णालय आणि नगरपालिका रुग्णालयात तर ग्रामीण भागात सर्व म्हणजे सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी लसीकरण सुरू आहे. ज्या केंद्रांवर लसीकरण होत असते अशा सर्वच केंद्रांवर लस मिळावी, यासाठी नागरिक गर्दी करीत असतात. उपजिल्हा रुग्णालयात गर्दी जास्त होत असल्याने त्या ठिकाणी पोलिसांनाही पाचारण करावे लागते. म्हणून लसींची उपलब्धता वाढावी ही नागरिकांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. याही पुढे जाऊन लसीकरण केंद्रावर लस आल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचीच डोकेदुखी वाढलेली असते आणि म्हणून जरी शासनातर्फे लस घेण्यासाठीचा संदेश नागरिकांना भ्रमणध्वनीवर गेलेला असतो तरीही काही नागरिक रांगेत उभे राहून आधार कार्ड सोबत ठेवून
लसीकरण करून घेण्यासाठी सकाळपासून रांगा लावत असतात. या रांगेत क्रमांक मागेपुढे झाल्यावर आपसात हुज्जत होऊन हाणामारीपर्यंत प्रकरण गेलेले आहेत.