लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरणात रविवारी शहरातील केवळ रेडक्रॉस रक्तपेढीत लसीकरण सुरू होते, मात्र, अचानक सकाळी ७ वाजता ३० ते ४४ या वयोगटासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक असल्याच्या सूचना केंद्राला प्राप्त झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. कुपन घेण्यासाठी आलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही ३० ते ४४ वयोगटाची होती. यात ५० टक्के ऑफलाइन आणि ५० टक्के ऑनलाइन असे बंधन असल्याने २०० जणांची स्पॉटवर नोंदणी करण्यात आली.
३० ते ४४ वयोगटाचे लसीकरण शनिवारपासून सुरू झाले. सुरुवातीला या वयोगटाला ऑनलाइन स्लॉट बुकिंगची आवश्यकता नसल्याच्या सूचना होत्या. त्यानुसार शनिवारी शहरातील सात केंद्रांवर लसीकरण पार पडले. मात्र, दुसऱ्याच दिवशी अचानक स्लॉट बुकिंग बंधनकारक करण्यात आल्याचे कुपन घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना समजले. दरम्यान, या परिस्थितीमुळे लसीकरण करणारे कर्मचारी व लाभार्थी दोन्ही रविवारी संभ्रमात होते.
असे आहे नवे सेशन
नवीन सेशननुसार आता केंद्राला ज्या लसी उपलब्ध होतील, त्यातील साठा हा ५० टक्के ऑनलाइन नोंदणी केलेल्यांसाठी राखीव तर ५० टक्के हा ऑफलाइन ऑन दी स्पॉट नोंदणी करणाऱ्यांसाठी राहणार आहे. सर्वच वयोगटासाठी हे नियोजन राहणार आहे. ऑनलाइन नोंदणी करताना दिवसाच्या उद्दिष्टाच्या ५० टक्केच नोंदणी होणार आहे.
असे झाले लसीकरण
शनिवारी महापालिकेच्या केंद्रांवर ३० ते ४४ वयोगटाच्या १८२८ लोकांनी लस घेतली तर रोटरीच्या केंद्रावर ३४६ जणांनी पहिला डोस घेतला. दरम्यान, लस उपलब्ध नसल्याने महापालिकेची व रोटरी येथील केंद्र रविवारी बंद होते. केवळ रेडक्रॉस रक्तपेढीचे केंद्र सुरू होते. या ठिकाणी २०० जणांना ऑनलाइन तर २०० जणांना ऑफलाइन असे रविवारी लसीकरण झाले.
१८ ते ३० वयाेगटाला प्रतीक्षाच
केंद्र सरकारने १८ ते ३० वयोगटाचे लसीकरण २१ जूनपासून सुरू होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, राज्यात याबाबत अद्याप मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या नाही. केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून सद्य:स्थिती राज्यात ३० ते ४४ वयोगटाचे लसीकरण होत असून हळूहळू गर्दी कमी झाल्यानंतर १८ ते ३० या वयोगटाचे लसीकरण सुरू होऊ शकते, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, गायत्री व संवेदना या दोन खासगी केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. १८ वर्षावरील सर्व वयोगटासाठी या ठिकाणी लस उपलब्ध राहणार आहे.