जामनेर : लसीकरणाचा मंदावलेला वेग, अपुरा पुरवठा पाहता सर्वांना लसीकरण हे शासनाचे उद्दिष्ट स्वप्नवत वाटत आहे. ४५ वर्षांवरील सुमारे २५ टक्के नागरिकांचेच लसीकरण झाले असून, १८ वर्षांवरील लसीकरणाची टक्केवारी अवघी ३ टक्के इतकी आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या वादात लसीकरण अडल्याने मुळातच उशीर झाला. उपलब्ध लसीचा साठा व मागणी याचे विषम प्रमाण असल्याने तालुक्यातील सर्वच आरोग्य केंद्रांवर लस घेणाऱ्यांच्या लांबलचक रांगा दिसून येत आहेत. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील अपूर्ण मनुष्य बळामुळे ठिकठिकाणी गर्दी, गोंधळाची स्थिती होती. १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी ॲपवरील नोंदणीतील सावळ्या गोंधळाने आरोग्य कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढवली होती. तालुक्याबाहेरील नागरिकांनी केलेल्या घुसखोरीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याने या वयोगटाचे लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला गेला. सध्या ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू असून, काही ठिकाणी छुप्या मार्गाने १८ ते ४४ वयोगटालादेखील लसी दिल्या गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
लसीकरणाची सद्य:स्थिती
४५ वर्षांवरील नागरिकांची अंदाजे संख्या ९० हजार
झालेले लसीकरण
पहिला डोस : २३,४८४
दुसरा डोस : ६०९९
१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची अंदाजे संख्या एक लाख २० हजार
झालेले लसीकरण
पहिला डोस २००४
दुसरा डोस १२०४
डोस देण्यात आलेल्यांमध्ये फ्रंटलाइन वर्करचादेखील समावेश आहे.
१८ वर्षांवरील सामान्य नागरिकांना यापैकी ८०० डोस देण्यात आले; परंतु ऑनलाइन प्रणालीमुळे बाहेरच्या तालुक्यातील नागरिकांनी या ८०० डोसमधून अधिक प्रमाणात लस घेतली असल्याचे दिसून येते. तालुक्यातील १८ वर्षांखालील संख्या ही अंदाजे दीड लाख असावी.
खासगी केंद्रांवर मनमानी
लसीकरणाच्या सुरुवातीला काही खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी देण्यात आली होती. या ठिकाणाचे लसीकरण सशुल्क असल्याने काही प्रमाणात ४५ पेक्षा कमी वयोगटालासुद्धा लस दिल्याचा आरोप झाला होता.
हे आहे वास्तव
कष्टकरी, श्रमिक व झोपडीत राहणारे नागरिक लसीकरणापासून दूरच आहे. लसीकरण केंद्रांवर राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी दिसत असली तरी यातील कुणीही या वंचितांना लसीकरण केंद्रांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला नसल्याचे दिसते. मतदान केंद्रावर आणण्यासाठीची चढाओढ यावेळी का नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.
===Photopath===
260521\26jal_6_26052021_12.jpg
===Caption===
खादगाव (ता.जामनेर) उपकेंद्रावर वृध्द महिलेस लस देताना आरोग्य सेविका