लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : कोणतीही पूर्वसूचना न देता लसीकरण बंद ठेवल्याने लसीकरणासाठी रांगेत थांबलेल्या नागरिकांना गुरुवारी सकाळी मोठा मनस्ताप सहन करावा लागला. न्यू इंग्लिश स्कूलमधील केंद्रावर हा प्रकार घडला. संतप्त नागरिकांनी केंद्रासमोर असलेल्या तहसील कार्यालयात तहसीलदार अरुण शेवाळे यांना याबाबत सांगितले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटा, असे त्यांनी सांगितल्याने नागरिक आरोग्य विभागाबद्दल संताप व्यक्त करीत माघारी परतले.
दरम्यान, शुक्रवारीदेखील लसीकरण बंदच राहील, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे यांनी दिली. गुरुवारी सकाळी लसीकरणासाठी केंद्रावर महिला व पुरुष मोठ्या संख्येने पहाटेपासूनच रांगेत उभे असताना त्यांना लसीकरण करण्याऐवजी अन्य ठिकाणी जाऊन लसीकरण केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.
कोट
कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने आरोग्य विभागाने निम्मे कर्मचारी कमी केले आहेत. लसीकरणासाठी कर्मचारी कमी पडतात. गुरुवारी उपलब्ध लसीतून न्यायालयीन कर्मचारी व वकिलांना न्यायालयात जाऊन लसीकरण करावे लागल्याने केंद्रावरील लसीकरण बंद ठेवावे लागले. शुक्रवारीदेखील लसीकरण बंदच राहील.
- डॉ. विनय सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, जामनेर