लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शनिवारी जिल्ह्याला कोविशिल्ड लसीचे १७ हजार ४०० तर कोव्हॅक्सिनचे २४०० डोस प्राप्त झाले असून आता आदिवासी भागांमध्ये लसीकरण मोहीमेला गती देण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर यावल, चोपडा, रावेर या भागात १० हजार डोस देण्यात आले आहेत. तर जळगाव शहराला कोविशिल्डचे ८०० डोस मिळाले आहे. शहरातील महापालिकेची केवळ तीन केंद्र सुरू राहणार आहेत.
रविवारी महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटासाठी कोविशिल्ड पहिला डोस, नानीबाई अग्रवाल रुग्णालयातही ४५ वर्षावरील नागरिकांना कोविशिल्ड लस केवळ दुसरा डोस, चेतनदास मेहता रुग्णालयात सर्व वयोगटासाठी केवळ दुसरा डोस कोव्हॅक्सिन उपलब्ध राहणार आहे. ५० टक्के ऑनलाईन व ५० टक्के ऑफलाईन अशी सुविधा सर्व केंद्रांवर आहे. तर रोटरी व रेडक्रॉसचे केंद्र रविवारी बंद राहणार आहे.