लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लसींची कमी उपलब्धता असल्याने आज, सोमवारी शहरातील महापालिकेचे शाहू महाराज आणि डी. बी. जैन रुग्णालय ही दोनच केंद्रे सुरू राहणार आहेत. दरम्यान, रविवारी कोव्हॅक्सिनचे ७०० डोस उपलब्ध झाले होते. मात्र, ते दुपारपर्यंतच संपले. यासाठी स्वाध्याय भवन व रोटरी भवनात प्रचंड गर्दी झाली होती.
शहरातील दोन केंद्रांवर ४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसरा डोससाठी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. स्वाध्याय भवनात रात्री दीड वाजेपासून लसीकरणाला लोक आल्याची माहिती आहे. कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस अनेक नागरिकांचा बाकी असल्यामुळे या लसीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जळगावातील दोन केंद्रांसाठी ७०० डोस प्राप्त झाले होेते. त्यापैकी प्रत्येक केंद्रावर दुपारपर्यंतच प्रत्येकी ३५० जणांचे लसीकरण पूर्ण झाले.
दुसऱ्या डोसची गर्दी घटली
कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या डोसमध्ये तीन महिन्यांचे अंतर ठेवण्यात आल्याने आता दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या घटली असून, केंद्रांवरील गर्दी कमी झाली आहे. त्यातच कोव्हिशिल्डचे डोसही संपल्याने महापालिकेचे शाहू महाराज रुग्णालय आणि शिवाजी नगरातील डी. बी. जैन रुग्णालय या ठिकाणी कोव्हिशिल्ड लस उपलब्ध आहेत. बाकी अन्य सर्व केंद्रे सोमवारी बंद राहणार आहेत, अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली. दरम्यान, रेडक्रॉस व रोटरीचे केंद्रही लस नसल्याने बंदच राहील, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.