लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : १८ ते ४४ वयोगटात ज्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डाेस घेतला आहे, अशासांठी केवळ दुसऱ्या डोससाठी शहरातील चेतनदास मेहता रुग्णालयातील केंद्रावर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करण्यात आली असून यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक असल्याची माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.राम रावलानी यांनी दिली. शासनाकडून जशा सूचना प्राप्त होत आहेत, त्यानुसार हे डोस उपलब्ध केले जात असल्याचे डॉ. रावलानी यांनी सांगितले.
शहरात चेतनदास मेहता रुग्णालयात १८ ते ४४ तसेच ४५ वर्षावरील नागरिकांना कोव्हॅक्सिन हे केवळ दुसऱ्या डोससाठी उपलब्ध राहणार आहे. यासह रोटरी भवनातही कोव्हॅक्सिजन दुसऱ्या डोससाठी उपलब्ध राहणार आहे. महापालिकेच्या उर्वरित ८ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. दरम्यान, जिल्हाभरात आता दुसरा डोस राहिलेेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी केंद्रांकडे त्यांच्या याद्या सोपविण्यात आल्या असून केंद्रांनी फोन करून त्यांना लसीकरणासाठी बोलवून घ्यायचे व त्यांचे लसीकरण पूर्ण करून घ्यायचे असे नियोजन करण्यात आल्याचे माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी सांगितले.
२४०० कोव्हॅक्सिजन आल्या
गुरुवारी लसीचा पुरवठा नसल्याने केवळ दोनच केंद्रांवर लसीकरण झाले. सायंकाळी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिजनचे डोस प्राप्त झाले असून आता जिल्हाभरात कोविशिल्ड लसीचे ३२५७० तर कोव्हॅक्सिजनचे२४६० डोस इतका साठा असून केंद्रांना तो वाटप करण्यात आला आहे. जळगाव शहरातील केंद्रांवर ११०० डोस कोव्हॅक्सिन उपलब्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
आज कारागृहात लसीकरण
मोबाइल टीमद्वारे विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण केले जात असून शुक्रवारी जळगावातील कारागृहात या टीमद्वारे लसीकरण केले जाणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, १८ ते ४४ वयोगटासाठीचे लसीकरण येत्या आठवडाभरात सुरू होऊ शकते, असे संकेत असून केंद्रांवर गर्दी कमी राहत असल्याचे प्रशासनाकडून वरिष्ठांना कळविण्यात आले आहे, असेही डॉ.चव्हाण यांनी सांगितले.