शासनाने लक्ष्य दिले, मात्र लसींचा पुरवठाच कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : केंद्रीय मंत्र्यांनी डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र सध्या तरी जिल्ह्यात अशी कोणतीही परिस्थिती दिसून येत नाही. दर आठवड्यातून तीन दिवस तरी लसीकरण केंद्रे बंद राहत आहेत. तसेच जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची क्षमता दिवसाला ५० हजार नागरिकांना लस देण्याची आहे. असे असले तरी एवढा लसींचा पुरवठा नसल्याने डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण केले जाऊ शकत नसल्याची परिस्थिती आहे.
१६ जानेवारी रोजी जिल्ह्यात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा लस घेतली. त्यात जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचा समावेश होता. त्यानंतर आधी आरोग्य कर्मचारी, नंतर फ्रंटलाईन वर्कर, त्यानंतर सामान्य नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. आधी फक्त ज्येष्ठ नागरिकांनाच लस दिली जात होती. त्यानंतर ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लस देण्याचे शासनाने धोरण जाहीर केले.
त्यानंतर १८ ते ४५ वर्षांवरील नागरिकांनाही लस देण्यास सुरुवात केली. मात्र तिथेच गोंधळ उडाला. लसींचा अपुरा साठा, सतत होत असलेला तुटवडा यामुळे राज्य शासनाकडून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठीचे लसीकरण बंद करण्यात आले आहे. आता फक्त ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लस दिली जात आहे.
जिल्ह्यात लसीकरण केंद्रे किती ?
जिल्ह्यात सुरुवातीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फक्त आरोग्य कर्मचारी, इतरांसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र नंतरच्या काळात रेड क्रॉस, रोटरी भवन येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. आता जिल्हाभरात सध्या ३३ लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत, तर शहरात ९ केंद्रांवर लस दिली जाते.
१६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात
जानेवारी
प्रत्येक दिवशी ४०६ प्रत्येक आठवड्यात - २८४२ प्रत्येक महिन्याला - ६८९४
फेब्रुवारी
प्रत्येक दिवशी ८७३ प्रत्येक आठवड्यात ६१०८ प्रत्येक महिन्याला - २४४३२
मार्च
प्रत्येक दिवशी ४४२० प्रत्येक आठवड्यात ३०९४० प्रत्येक महिन्याला १३७०२२
एप्रिल
प्रत्येक दिवशी ५४४४ प्रत्येक आठवड्यात ३८१०८ प्रत्येक महिन्याला १६३३२०
मे
प्रत्येक दिवशी ६६१७ प्रत्येक आठवड्यात ४८४२२ प्रत्येक महिन्याला १९३६९१
१८ वर्षाआतील नागरिकांचे काय?
जिल्ह्यात १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांची संख्या ही १३ लाखाच्या जवळ आहे. सध्या १८ ते ४५ या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला शासनाने परवानगी दिली असली तरी, लसींच्या तुटवड्यामुळे हे लसीकरण देखील बंद करण्यात आले आहे. सध्या फक्त ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.
जिल्ह्यात दररोज येणाऱ्या लसींच्या साठ्यानुसार नागरिकांना लस दिली जाते. १८ वर्षाआतील नागरिकांच्या लसीकरणाबाबत अजून कोणताही धोरणात्मक निर्णय झालेला नाही. असा निर्णय देखील महिनाभराच्या आत होऊ शकतो.
लसींच्या डोसचा पुरवठा अखंडित आणि योग्य प्रमाणात मिळाला, तर डिसेंबरपर्यंत जिल्हाभराचे लसीकरण करता येऊ शकते.
कोट
सध्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची क्षमता ही दिवसाला ५० हजारापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याची आहे. लसींचा पुरवठा झाल्यास केंद्रे पूर्ण क्षमतेने चालतील आणि डिसेंबरच्या आधी जिल्ह्याचे लसीकरण होऊ शकेल.
- डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक