लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : १८ ते ४४ या वयोगटाचे लसीकरण सुरू होण्यास दोन दिवसांचा काळ लोटल्यानंतर आता ४५ वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाच्या अडचणी सुरू झाल्या आहेत. केंद्र आणि राज्य अशा दोन प्रकारांत साठा विभागला गेल्यामुळे अडचणीत वाढ झाली असून सोमवारी अनेक केंद्रांवर हा गोंधळ पाहायला मिळाला. रेड क्रॉस येथील केेंद्रात सकाळी तरुणांची गर्दी झाली होती. या केंद्रावर गर्दी नियंत्रणासाठी चार पोलीसच तैनात करण्यात आले आहे.
१८ ते ४४ वयोगटासाठी आधी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक आहे. त्यातही नोंदणी करून केवळ चारच केंद्रांपैकी एक केंद्र निवडून वेळ स्वत:च घ्यावयाचा असल्याने तरुणांची या नोंदणीनंतर केंद्र मिळण्यासाठी केंद्रांवर फिरफिर होत आहे. प्रत्येक केंद्रावर तरुण व त्यांचे पालक ही समस्या सोडविण्यासाठी विचारपूस करण्यासाठी केंद्रावर गर्दी करीत आहेत.
रेड क्रॉसच्या केंद्रावर गर्दी
रेड क्रॉस केंद्रावर लस मिळेल का नाही, हे विचारत, शिवाय लसीकरणाला उशीर होत असल्याचे कारण देत तरुणांची गर्दी झाली होती. तरुणांनी थेट आत प्रवेश केल्याने या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग नव्हते. पोलिसांनी अखेर यात हस्तक्षेप केला. त्यानंतर दुपारी दुसरे गेट बंद करण्यात आले होते. आलेल्यांना पोलीसच मार्गदर्शन करीत होते. गर्दी मात्र ओसरली होती.
स्तंभाच्या खाली लिस्ट
रेडक्रॉस रक्तपेढीच्या बाहेर असलेल्या ध्वजासाठी असलेल्या स्तंभाच्या खाली थेट लिस्ट लावण्यात येत आहे. या लिस्टमध्ये नाव असेल तरच लसीकरणाला थांबा, असे सांगण्यात येते. तरुण यायचे व ही लिस्ट बघायचे. दरम्यान, ४५ वर्षांवरील नागरिकांचीही दुपारी विचारपूस करण्यासाठी याठिकाणी गर्दी झाली होती. यात लस आल्यानंतर पेपरला येईल व त्यानंतर लसीकरणाला या, असे उत्तर पोलिसांकडून त्यांना दिले जात होते.
तीन दिवसांपासून लस नाही
तरुणांना राज्याची व ज्येष्ठांना केंद्राकडून येणारी लस दिली जात आहे. मात्र, केंद्राकडून तीन दिवसांपासून लस प्राप्त नसल्याने जिल्ह्यात चाळीसगाव वगळता सर्वच केंद्रांवर हे लसीकरण ठप्प आहे. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम वाढला आहे. तो दूर करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य उपाययोजना होत नसल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. शहरातील केंद्रांवर लस मिळत नसल्याने सकाळपासून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना परत जावे लागत आहे. मात्र, लसच नसल्याने आम्ही काय करू शकतो, अशी हतबलता यंत्रणा दाखवत आहे.
सकाळी गर्दी दुपारी शांतता
शाहू महाराज रुग्णालयात सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत काही प्रमाणात गर्दी झाली होती. नंतर मात्र, शांततेत लसीकरण सुरू होते. एका केंद्रावर एका दिवसाला २०० जणांची नोंदणी व तेवढ्याच लसी उपलब्ध होत आहेत. शहरात असे चार केंद्र आहेत. शिवाय, केंद्रांची नोंदणी करणे अत्यंत कठीण होत आहे. वेबसाइटवर स्लॉट पब्लिश झाल्याच्या अगदी दोन मिनिटांत केंद्र बुक होत आहेत.
या आहेत शंका, ही त्याची उत्तरे
प्र : ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसऱ्या डोससाठी नोंदणी आवश्यक आहे का?
प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी : लस उपलब्ध असल्यास ऑनलाइन आणि ऑनसाइट असे दोन्ही पर्याय या वयोगटासाठी उपलब्ध आहेत. ऑनलाइन नोंदणी केली तरी हरकत नाही किंवा ऑनसाइट जाऊनही नोंदणी केली तरी लस उपलब्ध असल्यास मिळेल.
प्र : आता कोणासाठी लस आहे ?
डॉ. राम रावलानी : सद्य:स्थितीत ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिल्या किंवा दुसऱ्या डोससाठी लस उपलब्ध नाहीत. जी लस आहे ती केवळ १८ ते ४४ वयोगटासाठीच आहे. बुधवारी या वयोगटासाठी लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.