लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : उपजिल्हा रुग्णालयात लसीचा साठा संपल्याने सोमवारी लसीकरण थांबविण्यात आले. ऑक्सिजनचा साठाही संपत असून, गरज भासणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजन कसे पुरवावे, अशी चिंता प्रशासनास भेडसावित आहे.
गेल्या शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयातील १२ रुग्णांना ऑक्सिजनअभावी साकेगाव येथील डॉ. उल्हास पाटील यांच्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये हलवित असताना ढालसिंगी येथील महिलेचा गारखेडे (ता.जामनेर) येथे दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रशासनाकडून काही सिलिंडरचा पुरवठा करण्यात आला; मात्र ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णाची संख्या वाढत असल्याने आज पुन्हा ऑक्सिजन संपले.
लसीचाही पुरवठा अनियमित होत आहे. त्यामुळे लसीसाठी नागरिकांची फरफट सुरू आहे. एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना लस घेण्यासाठी शासन आग्रह करीत आहे, तर केंद्रावर लस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना माघारी फिरावे लागत आहे.
रुग्णांनो, गोदावरीला जा
जामनेर व पहूर येथील शासकीय रुग्णालयांतील ऑक्सिजनसाठा पुन्हा संपल्याने ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना साकेगाव येथील गोदावरी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. ऑक्सिजनअभावी गंभीर रुग्णांची स्थिती बिकट होत असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.