लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम लसीचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने कधी सुरू, तर कधी बंद, अशा अवस्थेत राबविली जात आहे. दोन दिवसांपासून शहरातील लसीकरण केंद्र डोस नसल्यामुळे बंद होते. तिसऱ्या दिवशी दहा केंद्रे सुरू झाली. मात्र, पुन्हा लसीचा तुटवडा झाल्यामुळे यातील सात केंद्रे बंद झाली आहेत. आज, शुक्रवारी शहरातील केवळ तीन केंद्रांवर लसीकरण होणार आहे. दरम्यान, कोव्हिशिल्ड लसीचे १६००० डोस उद्या, शनिवारपर्यंत केंद्रांना प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शहरातील स्वाध्याय भवन आणि कांताई नेत्रालय या केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जात असल्याने या केंद्रांवर काही प्रमाणात गर्दी होती. मात्र, या केंद्रांवरील कोव्हॅक्सिन लसीचे डोस संपल्याने ही केंद्रे आज बंद राहणार आहेत. गुरुवारी अन्य सर्व केंद्रांवर कोव्हिशिल्ड लसीचे ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी दुसरा डोस प्राधान्य व पहिला डोस अशाप्रकारे लसीकरण सुरू होते.
आज छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, डी. बी. जैन रुग्णालय आणि शाहीर अमर शेख हॉस्पिटल या ठिकाणीच लसीकरण सुरू राहणार आहे, अशी माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली. जिल्हा रुग्णालयाचे रोटरी भवन आणि रेड क्रॉस सोसायटी केंद्रात ही लस उपलब्ध नसल्याने बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.