आमदारांचे दत्तक गाव : विविध योजनांमधून कामे सुरु, भरघोस निधी लवकरच
चाळीसगाव,दि.11- आमदार उन्मेष पाटील यांनी 2016 मध्ये आमदार आदर्श गाव योजनेत वाघळी या गावाची निवड केली. गत दीड वर्षात विविध योजनेतून गावात विविध विकास कामे सुरु केल्याने गावाचा कायापालट होत आहे.
7 हजार लोकसंख्या
वाघळी हे चाळीसगाव- भडगाव रस्त्यालगतचे गाव. 2016 मध्ये आमदार आदर्श गाव योजनेअंतर्गत येथे विकास कामे सुरु झाली. गावाची लोकसंख्या7 हजार 16 असून 1313ं कुटुंबे वास्तव्यास आहेत.
शुद्ध पाण्यासाठी एटीएम
गावात शुध्द पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करण्यात आली. यासाठी एटीएम योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. आगाऊ नाममात्र पैसे भरुन 20 लिटर पाण्याचे जार उपलब्ध करुन दिले जातात. 20 लिटर पाणी केवळ 6 रुपयात ग्रामस्थांना याद्वारे मिळणार आहे. या प्रकल्पासाठी ग्रा. पं. ने बँकेकडून अर्थसहाय्य घेतले आहे.
शाळा डिजिटल करणार
जि.प.ची प्राथ. शाळा डिजिटल केली जाणार आहे. यासाठी प्रायोगिक तत्वावर काम देखील सुरु झाले असून सव्रेक्षही पूर्ण झाले आहे. शाळेत ई-लर्निगही क्लासरुमची संकल्पना राबविण्याचे नियोजन केले आहे.
ग्रीन व्हीलेज संकल्पना
ग्रा.पं. हद्दीत श्रमदानाच्या सिंचनाने ग्रीन व्हीलेज ही संकल्पना देखील राबवली जाणार आहे. याच परिसरात 150 झाडे फुलणार आहेत. गावाचा पाणी प्रश्नही सोडविण्यात आला आहे. मुंदखेडे धरणातून 2.16 टीएमसी पाण्याचे आवर्तन सोडले जाणार आहे.
व्हीलेज डेव्हलपमेंटसाठी साडेचार कोटीचा प्रस्ताव
आदर्श गाव योजनेअंतर्गत व्हीलेंज डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यात आला आहे. यासाठी वेगवेगळ्या विकास कामासाठी 4 कोटी 49 लाख रुपयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाने मंजूरही केला आहे. मात्र निधीची प्रतीक्षा आहे.
डासमुक्त गाव
गाव अंतर्गत शोषखड्डे करण्याचा उपक्रम राबवून डासमुक्त गाव हा पायलट प्रयोगही करण्यात येणार आहे. संपूर्ण गावात ई-सातबारा ही संकल्पना महसूल यंत्रणेमार्फत राबवली जात आहे.
बसस्थानक व महिला शौचालय समस्या सुटावी
वाघळी गावात अनेक समस्या आहेत. विशेषत: महिलांच्या शौचालयांचा प्रश्न गंभीर झाला असून येथे घाणीचा विळखा आहे. यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानकाचीही समस्या आहे. महिला शौचालये पूर्णपणे मोडकळीस आले आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्याही उग्र झाली आहे. समस्या व प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा प्रकाश सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.
राज्यातील इतर आदर्श गावांचे प्रयोग अभ्यासून वाघळी गावाची ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. मूलभूत सुविधासह पर्यटन व शैक्षणिक विकासही करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत ही कामे झाली आहेत. मदुराई देवी मंदिराच्या जीर्णोध्दारासाठी पुरातत्व विभागाकडून साडेतीन कोटी निधी मंजूर झाला आहे. हे मंदिर हेमाडपंथी आहे. गावाला जोडणा:या रस्त्यांसाठीही निधी देण्यात आला आहे.
- उन्मेष पाटील, आमदार चाळीसगाव
जलसिंचन कामे गावात झाली आहेत. बंधारा, शिवारातील जलपुर्नभरणाला अग्रक्रम दिलाय. दत्तक गाव योजनेतील निधी त्वरित मिळावा, अशी अपेक्षा आहे. तरुणांसाठी अभ्यासिका, पाणीपुरवठा आदी बरोबरच ग्रा.पं. च्या 160 एकर जमीनीवर शेतीचाप्रयोग करुन रोजगाराच्या संधी उपलब्ध झाला पाहिजे. यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव दाखल केला आहे.
- विकास त्र्यंबक चौधरी, सरपंच वाघळी
जिल्हा नियोजन मंडळाकडे गावविकासाचा प्रस्ताव दाखल आहे. आमदार निधीतून कामे झाली असली तरी आदर्श गाव योजनेसाठीच्या निधीची प्रतीक्षा आहे. आमदार सुरेश भोळे यांच्या माध्यमातून वाघळी ते चांभाडी रस्त्यावरील पुलाचे काम सुरु असून बँकेच्या सहाय्याने पाण्याचे एटीएमचे काम पूर्ण झाले असून हा प्रकल्पाची पूर्णत: सौर ऊज्रेवर चालणारी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. गावास आदर्श करुन दाखवायचे आहे.
-ए.टी.मोरे, ग्रामसेवक वाघळी