मूल्य या शब्दाला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. मूल्य ज्याला इंग्रजीत व्हॅल्यू असे म्हणतात. जगातील प्रत्येक गोष्ट ही मूल्याधिष्ठित आहे. मग ती वस्तू असो की माणूस प्रत्येकाला स्वत:चे असे मूल्य आहे. मूल्य हे केवळ पैशाने किंवा आकड्यात मोजले जाते असे नाही. समाजकारण, राजकारण, साहित्य, कला, विचार या आणि अशा अनेक क्षेत्रात मूल्य ही त्याची उंची ठरवते. याच मूल्यावर त्या कलाकृतीचा दर्जा ठरवला जातो. कलेच्या प्रांतात मूल्य ही संकल्पना वेगवेगळी ठरते.एखाद्या शिल्पकृतीचे मूल्य तिच्या निर्मिती कौशल्यावरून, तिच्या सुबकतेवरून ठरते. तर एखादे नृत्य हे त्याच्या ताल, लय, अदा, हालचालीतले सौंदर्य इत्यादी परिणामांवरून ठरते.नाट्यकलेचे मूल्य हे दोन प्रकारे जोखता येते. एक म्हणजे त्या नाटकाचे साहित्यमूल्य व दुसरे म्हणजे सादरीकरणाचे मूल्य. या दोन्ही मूल्यावर नाटकाची पारख करता येते. तुलनात्मक मूल्य तिच्या अर्थपूर्णतेवर किंवा तिच्या गेय्यतेवर ठरते. एखाद्या चित्राचे मूल्य हे त्यातल्या रंग, रेषा, आकार यावरून ठरते. फार काय तर ते चित्र बाजारात विकावयास आले तर त्याचे मूल्य हे रुपयात मोजले जाते. नाटक ही प्रथम साहित्यकृती आहे. नाटक हे साहित्य म्हणून जसे वाचनीय आहे तसेच ते रंगमंचावर दृश्य स्वरुपात बघणे अनिवार्य आहे आणि म्हणूनच त्याला दोन प्रकारची मूल्ये आहेत.कोणत्याही साहित्याची जी काही मूल्ये असतात ती सगळी नाटकास लागू आहे. नाटकाची भाषा, विचार, सौंदर्य, मांडणी, समकालिनता, जातकुळी हे सारेच नाटकाचे साहित्य मूल्य ठरवत असते. केवळ साहित्य मूल्य उच्च आहेत म्हणून ते नाटक श्रेष्ठ ठरत नाही तर त्याच्यासोबत त्या नाटकात सादरीकरणाचे मूल्य अपेक्षित आहे तरच ते नाटक म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. नाटककराने जे काही शब्द कागदावर उतरवले आहेत त्याला प्रत्यक्ष जिवंत रूप देण्याची क्षमता त्या नाटकामध्ये आहे का? ते नाटक रंगमंचाच्या मर्यादांचा विचार करून लिहिले आहे का? केवळ कवीकल्पनेचा अविष्कार, किंवा रिअॅलिटीच्या नादी लागून हे नाटकात दिसले पाहिजे असा अट्टाहास करणे गैर आहे. रंगमंचावरील असलेल्या साधनांचा, सुविधांचा, काळ आणि वेळेच्या मर्यादांचा विचार करू न नाटक केले जाते. नाटकात एखादे दृश्य दाखवयाचे असेल तर ते वेगवेगळ्या शैलींचा वापर करून, तंत्राच्या मदतीने दाखवता येईल. यात सतत होणारा बदल हा प्रेक्षकांचा रसभंग करतो. कथा आणि नाटक यात मूलत: फ रक हाच आहे. कथेत अनेक लोकेशन्स शक्य आहेत. चित्रपटात त्या दाखवता येतात पण रंगमंचावर मात्र याला बंधन येते. हा झाला तंत्रयोजनेचा प्रश्न. एखाद्या नाटकाराचे नाटक वाचताना ते खूप आनंद देऊन जाते. पण तेच निर्मित करताना दिग्दर्शकाच्या क्रिएटीव्हीचा अंत पाहिला जातो. बरं एवढं करून ते रंगमंचावर उभे जरी राहिले ते नाटक म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणे ही पुन्हा अग्नीपरीक्षा असते. प्रेक्षक नाटक पाहतात ते त्यातील नटांना प्रतीक समजून त्या नटाभोवती त्यांची नजर घुटमळत असते. त्यांच्याच खांद्यावर नाटकाचा डोलारा उभा असतो. खूप साहित्यिक जडबंबाळ भाषा, सतत दृश्यांचा बदल, प्रकाशात करावे लागणारे बदल अनेक प्रवेश किंवा दृश्ये ही सगळीच नाटकाच्या प्रवाही पणाला मारक ठरतात आणि मग या साठमारीत नाटकाचा मूळ अर्थ हरवला जातो.लेखकाच्या मनात पडलेली एखादी तीव्र संघर्षाची ठिणगी तिचे रूपांतर ते शब्दाद्वारे नाटकात असतो. त्या संघर्षमय ठिणगीचा अविष्कार हाच काय तो खरा त्या नाटकाचा आत्मा आहे. बाकी सगळं पूरक आहे. थोडक्यात, काय तर जे काही नाटककाराने साहित्य रुपात मांडले त्याचा सादरीकरणातून योग्य तो अविष्कार जर होत असेल तरच त्या सगळ्या प्रक्रियेची यशस्वीता आहे. अन्यथा नाटक पडले अशाच टीकेला त्या कलावंतांना धनी व्हावे लागते. या दोन्ही मूल्यात समतोल साधला तर त्या नाटकाचा रसपरिपोष होऊन प्रेक्षक आनंद सागरात डुंबत राहतील हा निर्मल विश्वास आहे.-डॉ.हेमंत कुलकर्णी, जळगाव
नाट्यकलेचे मूल्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 3:04 PM