जळगाव : ‘पहिली गं पूजा बाई देव- देव सांजे’, ‘एकेक दाणा पेरत जाऊ...’, ‘कारल्याचे बी पेरलं गं सई, पेरलं गं सई’, ‘अक्कण माती चिक्कण माती...’, ‘सा बाई सू बेलाच्या झाडामागे महादेवा तू’ असे विविध शंकर-पार्वतीचे गीत सादर करीत लोकसंस्कृती, परंपरेसोबत आधुनेकतीची सांगड घालत रविवारी आयोजित भुलाबाई महोत्सवातून विविध सामाजिक संदेश देण्यात आले. तसेच मोबाईलमुळे कौटुंबिक संवाद हरविल्याने त्याचे होणारे परिणाम यासारख्या विषयांना हात घालत विद्यार्थिनींनी भुलाबाईच्या गीतांतूनच प्रबोधन केले. केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला अकादमीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रविवारी भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिला आणि मुलींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या महोत्सवाचे उद््घाटन परिवहन महामंडळाच्या जळगाव आगार प्रमुख नीलिमा बागूल यांच्याहस्ते झाले. यावेळी महोत्सव प्रमुख प्रतिमा याज्ञिक, ललित कला अकादमीचे प्रमुख पियूष रावळ, केशवस्मृती प्रतिष्ठानच्या संचालिका मनीषा खडके, उपप्रमुख साधना राजे उपस्थित होत्या. या महोत्सवात लहान गट, मोठा गट आणि खुला गट याप्रमाणे स्पर्धा घेण्यात आली. सर्व गटांमध्ये एकूण ४५ गटांनी सहभाग नोंदविला. या महोत्सवादरम्यान विविध आकर्षक वेशभूषा करून मुलींनी भुलाबाईच्या गीतांमधून शंकर- पार्वतीची आराधना केली. टिपरीच्या तालावर मुलींनी नृत्य सादर केले. सूत्रसंचालन प्रांजली रस्से यांनी केले. अभिनेत्री दाते यांच्या हस्ते पारितोषिक वितरण दिवसभर सादर झालेल्या नृत्यांनंतर सायंकाळी साडेसहा वाजता पारितोषिक वितरण समारंभाला सुरुवात झाली. प्रास्ताविक प्रतिमा याज्ञिक यांनी केले. यावेळी नाट्यअभिनेत्री अनिता दाते - केळकर, महापौर सीमा भोळे, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया देशमूख, केशव स्मृती प्रतिष्ठानच्या संचालिका अनिता कांकरिया, मनीषा खडके, पियूष रावळ, प्रतिमा याज्ञिक यांच्या हस्ते विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेतील विजेते गट लहान गट : प्रथम - सावित्रीबाई फुले गट, द्वितीय- कल्पना चावला गट, तृतीय- अ. वा. अत्रे इंग्लिश मिडीयम स्कूल, उत्तेजनार्थ गौतमी महिला मंडळ व अँथिली ग्रुप. मोठा गट : प्रथम - भगीरथ इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय- विद्या विकास मंदिर, तृतीय- बहिणाबाई कन्या समूह, उत्तेजनार्थ - रमाबाई रानडे ग्रुप. खुला गट : प्रथम- सखी माऊली मंडळ, द्वितीय नानाश्री प्रतिष्ठान, तृतीय- रवींद्र नगर बहुद्देशीय मंडळ, उत्तेजनार्थ - बाप्पा मोरया गु्रप.
जळगावात भुलाबाई महोत्सवातून लोकसंस्कृती व आधुनिकतेची सांगड घालत दिले विविध संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 1:23 PM
सावित्रीबाई फुले गट, भगीरथ इंग्लिश मीडियम स्कूल, सखी माऊली मंडळ विविध गटातून प्रथम
ठळक मुद्देउत्स्फूर्त प्रतिसादशंकर-पार्वतीचे गीत सादर