दीपनगर, ता.भुसावळ, जि.जळगाव : दीपनगर वीज निर्मिती केंद्राचा सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन हर्षोउल्हासात पार पडला. सकाळी सहा वाजता टप्पा क्रमांक २ द्वारपूजन करून करण्यात आले. टप्पा क्रमांक ३ च्या द्वारपूजनानंतर सुरक्षितता आणि पर्यावरणविषयक पथनाट्य सादर करण्यात आले.या वेळी केंद्राचे संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे, कार्यकारी संचालक (संचलन व सुव्यवस्था १) कैलाश चिरूटकर, कार्यकारी संचालक (व्यवस्थापन आणि सुसंवाद) सतीश चवरे, मुख्य अभियंता (सुरक्षा) कर्नल भारतभूषण दास उपस्थित होते. हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाही त्यांनी कारखान्यातील बगिच्यांचे उद्घाटन सामान्य कर्मचारी आणि वसाहतीमधील बगिच्यांचे उद्घाटन गृहिणी महिलांच्या हस्ते करण्याचा मान दिला.कोळसा हाताळणी विभाग, शक्तीगड कार्यालय, प्रमुख भांडार, स्थापत्य विभाग व वसाहतीमधील बीएम सेक्टर, डीएम सेक्टर या ठिकाणी बगिच्यांचे उद्घाटन करण्यात आले. दीप क्रीडांगणावर क्रिकेटचा मैत्री सामना घेण्यात आला.टप्पा क्रमांक ३ च्या संच क्रमांक ४ च्या वार्षिक देखभालीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची अधिकाऱ्यांनी पाहणी केली.सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाचा मुख्य समारंभ सायंकाळी झाला. चंद्रकांत थोटवे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून कर्नल सुनील कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले. प्र्रास्ताविक आयोजन समिती सचिव उपमुख्य अभियंता नितीन पुणेकर यांनी केले. शुभेच्छा संदेश वाचन जनसंपर्क अधिकारी मोहन सरदार यांनी केले.सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाचा मुहूर्त साधून केंद्रातील अभियंता, अधिकारी, कर्मचारी आणि वसाहतीमधील गृहिणी, मुले-मुली यांच्या कला-गुणांना वाव मिळावा म्हणून विविध लेख, कविता, चारोळी, अनुभव, आठवणी या विविधांगी साहित्याची रेलचेल असलेली ‘दीपरंग’ स्मरणिका तयार करण्यात आली. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यात केंद्र्राचा आढावा मुख्य अभियंता राजेंद्र बावस्कर व उपमुख्य अभियंता नंदकिशोर देशमुख यांनी दिलेला आहे.माहिती आणि तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण वेगाने व्हावी यासाठी महानिर्मितीच्या बीटीपीएस इंट्रानेट साईटचे रिमोटवर विमोचन करण्यात आले. माहिती-तंत्रज्ञान विभागाचे उन्मेष गिरगावकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती सादर केली.समारोह समिती उपाध्यक्ष तथा उपमुख्य अभियंता (प्रकल्प) मोहन आव्हाड यांनी आभार मानले.
वीज निर्मिती केंद्र वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 3:06 PM