विजयकुमार सैतवालजळगाव : जिल्ह्यात यंदाही पावसाने सत्तरीदेखील न गाठल्याने पाणीटंचाईचे सावट असताना कृषी उत्पादनांवरही त्याचा परिणाम होऊन बाजारपेठेमध्ये भाववाढीस सुरुवात झाली आहे. कमी पावसामुळे कडधान्याच्या उत्पादनावर परिणाम होऊन डाळींच्या भावात तब्बल २०० ते ४०० रुपये प्रती क्विंटलने वाढ झाली आहे.यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जळगाव जिल्ह्यात उडीद व मुगाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. उडीद-मुगाच्या शेंगांमध्ये दाणा तयार होण्याचा प्रक्रियेदरम्यानच पावसाने पाठ फिरविली होती. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जळगावच्या बाजारात येणाऱ्या आवकमध्ये मोठी घट दिसून येत आहे.गेल्या आठवड्यात मूग डाळींचा दर ६,४०० ते ६,६०० रुपये प्रतिक्किंटल इतका होता. सध्या मूग डाळींचा दर दोनशे रुपयांनी वाढला असून, ६,६०० तो ७,००० रुपये इतका झाला आहे. उडदाचा दर ५,४०० रुपये प्रतिक्विंटल इतका आहे. भाव वाढल्याने शेतकरी माल बाजारात आणतील, अशी शक्यता होती. मात्र, भाव वाढले असले तरी ज्या प्रमाणात मालाची आवक वाढायला हवी होती, तितकी आवक बाजारात दिसून येत नाही. उडीद-मुगामधील ओलाव्याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. डाळींचा दर्जादेखील चांगला असल्याने दर वाढले आहेत.बाजार समितीमध्येदेखील आवक घटली असून उडदाची आवक २ हजार क्विंटल तर मुगाची आवक ७०० क्विंटल इतकी आहे. पितृपक्ष संपल्यानंतर आता नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली व पुढे दिवाळी आहे. त्यादरम्यान, डाळींच्या दरात वाढ झाल्याने शेतकºयाला दिलासा मिळाला आहे. तूर डाळीच्या दरातदेखील प्रतिक्विंटल १५० रुपयांची, तर चना डाळीतही २०० रुपयांची वाढ झाल्याची माहिती दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली आहे. डाळींव्यतिरीक्त गहू व तांदळाचे दर स्थिर आहेत. मात्र, दिवाळीपर्यंत मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने दरातदेखील वाढ होण्याची शक्यता आहे.सध्या बाजारात सोयाबीनची आवकदेखील कमी आहे. आॅक्टोबर महिन्यात सोयाबीन काढण्यास सुरुवात होते. मात्र, अद्याप बाजारात सोयाबीनची आवकदेखील वाढलेली नाही. सध्या २,८०० ते ३,००० रुपये प्रतिक्विंटल इतके सोयाबीनचे भाव आहेत. त्यामुळे भावात वाढ होईल या अपेक्षेने शेतकरी आपला माल बाजारात आणत नसल्याचे चित्र आहे. ज्या शेतकºयांना पैशांची गरज आहे असेच शेतकरी आपला माल बाजारात आणून विकून मोकळे होत आहेत.शासकीय उडीद-मूगखरेदी केंद्र सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिल्यानंतरदेखील खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. अनेक शेतकरी हे केंद्र सुरू होईल याच अपेक्षेने आपला माल बाजारात आणत नसल्याचेदेखील दिसून येत आहे. त्यामुळे हंगाम संपल्यानंतर खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील का? असा सवाल केला जात आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत गव्हाच्या भावात ५० रुपये प्रतिक्विंटलने वाढ झाली आहे. १४७ गहू २,४०० ते २,५०० रुपयांवरून २,४५० ते २,५५० रुपये प्रतिक्विंटल, लोकवन गव्हाचे भाव २,३५० ते २,४५० रुपये, शरबती गहू २,५५० ते २,६५० रुपये आणि चंदोसीचे भाव ३,६५० ते ३,८५० रुपयांवर पोहोचले आहेत.त्यात आता कमी पावसामुळे रब्बी हंगामावरही परिणाम होणार असण्याची चिन्हे असून त्यापूर्वीच हरभरा डाळीचेही भाव वाढल्याने ग्राहकांची चिंताही वाढली आहे.
वरुणराजाच्या रुसव्याने पुन्हा भाववाढीचा तडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:59 PM