संजय पाटीललोकमत न्यूज नेटवर्कअमळनेर : सकाळची वेळ होती... साडे चार वर्षांची ईश्वरी खेळता खेळता अचानक दीड फूट रुंदीच्या खड्ड्यात पडली...जवळचे लोकानी नायलॉन दोरी टाकली ...मुलीने दोरी पकडली..पालकांनी दोरी ताडकन ओढली...तशी दोरीही तुटली...मुलीचे चार बोटे फ्रॅक्चर झाली...मुलगी पडली ...तिचे त्राण गेले...जीव गुदमरू लागला...आई केविलवाणी होऊन अश्रू गाळू लागली... घटना कळताच पोलीस निरीक्षक वासुदेव देसले कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह तात्काळ पोहचले... ताबडतोब ऑक्सिजन मागवून नळी टाकली...मुलीला बरे वाटू लागले...पालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने दीड दोन तासानंतर जिवंत बाहेर काढण्यात आले. ईश्वरी साठी वासुदेव जणू ऑक्सिजन (प्राण)ठरला होता.कोपरगाव येथील मोहनिराज नगर मध्ये एका ठिकाणी वॉल कंपौंड चे बांधकाम सुरू होते. त्यासाठी दीड फूट रुंद व बारा फूट खोल असलेले पाईल (खड्डे ) करण्यात आले होते. ९ रोजी सकाळी साडे दहा वाजता तेथे ईश्वरी संतोष गंगावने ही साडे चार वर्षांची चिमुकली खेळता खेळता खड्ड्यात पडली. क्षणात ओरडण्याचा आवाज ऐकताच तिच्या आईने ताबडतोब धावपळ करीत आजूबाजूच्या लोकांना बोलावले. खड्ड्यात दोरी टाकून मुलीला दोरी पकडण्यास सांगण्यात आले. मात्र जोरात हिसका देऊन मुलीला काढण्याच्या प्रयत्नात मुलीचे चार बोटे फ्रॅक्चर झाली आणि दोरी सरकून मुलगी पुन्हा खाली पडली. ईश्वरीत त्राण उरले नव्हते. ऑक्सिजन चा पुरवठा कमी होत असल्याने जीव गुदमरत होता. कोणीतरी कोपरगाव पोलीस स्टेशनला फोन केला. अमळनेरचा सुपुत्र पोलीस निरीक्षक वासुदेव देसले आपल्या सहकाऱ्यांसोबत पोहचले. घटनेचे गांभीर्य पाहता त्यांनी ताबडतोब ऑक्सिजन सिलिंडर मागवले. नळी टाकून ऑक्सिजन मुलीपर्यंत पोहचविला. ईश्वरीत पुन्हा त्राण आले. त्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले. ऑक्सिजन तसाच सुरू ठेवून त्या खड्ड्याला समांतर खड्डा खोदण्यात आला. दीड दोन तासांनंतर ईश्वरीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. बाहेर येताच आईने तिला घट्ट मिठी मारली डोळ्यातून आनंदाश्रू घळा घळा वाहू लागले. वासुदेव देसले यांनी उपचारसाठी मुलीला दवखाण्यात दाखल केले.यापूर्वीही वासुदेव देसले यांनी अशाच पद्धतीने सटाण्याला असताना पुरात वाहून जाताना एका तरुणाला वाचवले होते. त्यांच्या पत्नी सुषमा देसले देखील अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे सरपंच असून सामाजिक व पर्यावरण पूरक कार्य सुरू असते. बिहार पॅटर्न अंतर्गत त्यांनी विक्रमी झाडांची लागवड करून अनेक महिलांना रोजगार दिला आहे. मुलीचे प्राण वाचवल्याबद्दल वासुदेव देसले यांचा सत्कार करण्यात आला.
ईश्वरीसाठी वासुदेव ठरला प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 1:44 PM