ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.2- शेतक:यांनी 1 जून पासून पुकारलेल्या संपाचा परिणाम आता बाजारपेठेवर जाणवू लागला आहे. बाजारपेठ सुरू असली तरी मालाची आवक कमी झालेली आहे. भाज्यांचे दरही वधारले आहेत.
अमळनेर येथील भाजीबाजार आज नेहमीप्रमाणेच सुरळीत सुरू होता. येथे धुळे, धरणगाव, चोपडा परिसरातून भाजीपाला येत असतो. तो नेहमीप्रमाणे आला. सकाळी लिलाव झाला.आवक थोडी मंदावली आहे. मात्र त्याचा परिणाम दरावर झालेला नाही. नेहमी ज्या भावात भाजी मिळते, त्याच भावात आजही मिळत असल्याने, ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे. दरम्यान येथे नाशिक, संगमनेर येथून टमाटय़ांची आवक होत असते. ती आज झाली नाही.
बाजार समिती सुरळीत
भाजीपाल्याबरोबरच कृषी उत्पन्न बाजार समितीही आज सुरू होती. लिलाव सुरू होता. मात्र दुपारी 12 वाजेर्पयत फक्त 15 ते 20 वाहनांमधूनच धान्य आल्याचे सांगण्यात आले.
चोपडय़ात आवक कमी
चोपडा येथील बाजारात आज नेहमीपेक्षा बाजारात भाजीपाल्याची आवक कमी होती. भाजीपाल्याचे भाव दीडपट वाढले होते. टमाटय़ांचा 200 रूपयांना मिळणारा कॅरेट आज 300 ते 350 रूपयांना गेला. तीच स्थिती वांगे, मिरची, गलके आदी भाज्यांची होती. या भाज्यांचे दरही वाढले होते. दरम्यान शहरासह तालुक्यात दूध विक्री सुरळीत सुरू होती.
अडावद येथेही दररोज भाजीबाजार भरतो. मात्र संपाचा कुठलाही परिणाम येथील भाजीबाजारावर झालेला नाही. आजही बाजार सुरळीत सुरू होता.
पारोळा शहरात आज भाजीपाला विक्री सुरू असली तरी मोजकेच विक्रेते आले होते. बाजारपेठेत नेहमीपेक्षा गर्दी नव्हती. तसेच भाज्यांचे दरही वाढलेले होते.