सचिन देव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे, स्कूल बसही जागेवर उभ्या आहेत. शाळा बंद असल्याने, हजारो स्कूल बस चालक- मालकांवर बेरोजगारी ओढवल्यामुळे, या बसचा उपयोग भाजीपाला, फळे विक्री करण्यासाठी तर कुणी प्रवाशी वाहतूक करण्यासाठी सुरू केला आहे. या पर्यायी व्यवसायातून घरखर्च चालविण्यापुरती कमाई होत असली तरी, बसेसचे कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न या बस मालकांसमोर आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून तर आता अनलॉक झाल्यानंतरही शासनाने शाळा- महाविद्यालय बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातील सुमारे ८०० स्कूल बस मालक व त्यावरील चालक गेल्या दीड वर्षांपासून बेरोजगार आहेत. मात्र, बँकेच्या कर्जावर घेतलेल्या बसचे कर्ज फेडण्यासाठी या स्कूल बस मालकांना भाजीपाला, फळे, कपडे, विविध संसार उपयोगी वस्तू विक्री तर काहींनी या स्कूल बसमधून प्रवाशी वाहतूक सुरू केली आहे. मात्र, या पर्यायी व्यवसायातूनही पुरेसा नफा मिळत नसल्याने, या स्कूल बस चालकांना अधिकच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बँकेचे हप्ते फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे काही बस मालकांनी सांगितले. तरी शासनाने ज्याप्रमाणे इतर लहान-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक मदत केली, त्याप्रमाणे स्कूल बस मालक व चालकांनाही आर्थिक मदत करण्याची मागणी या स्कूल बस मालक-चालकांकडून केली जात आहे.
इन्फो :
शहरातील एकूण शाळा : १५०
शहरातील एकूण स्कूल बसेस : ४००
इन्फो :
गाडीवरील कर्ज कसे फेडणार
मी तीन वर्षांपूर्वी एका प्राथमिक शाळेतील मुलांना सोडविण्यासाठी बँकेच्या कर्जावर चारचाकी स्कूल बस घेतली आहे. पहिले वर्ष नियमित बँकेचे हप्ते फेडले. मात्र, गेल्या वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद असल्याने, या स्कूल बसचे हप्ते फेडणे अवघड झाले आहे. डिझेलचे दर वाढल्याने प्रवासी वाहतूक करणे परवडणारा व्यवसाय नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडावे हा प्रश्न पडला आहे.
राहुल पवार, बस मालक
शहरातील एका शाळेवर माझी स्कूल बस असून, मीच स्वतः बस चालवतो. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मी आता या बसचा उपयोग भाजीपाला विकण्यासाठी करत आहे. कर्जाचे हप्ते नुकतेच पूर्ण झाले आहेत, त्यामुळे आता थोडे टेन्शन कमी झाले आहे.
किरण परदेशी, मालक
इन्फो :
चालकांचे हाल वेगळेच
गेल्या अनेक वर्षांपासून मी एका खाजगी बसवर चालक म्हणून काम करत होतो. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने, परिणामी यामुळे स्कूल बसही बंद आहे. त्यामुळे मी आता एका माल वाहतूक टेम्पोवर चालक म्हणून काम करत आहे.
संजय पाटील, चालक
स्कूल बस बंद असल्याने, सध्या मी एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत आहे. मात्र, जे वेतन अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या स्कूल बसवर मिळत होते. ते वेतन या वाहनावर मिळत नाही. शाळा बंद असल्यामुळे, घर- संसार चालविण्यासाठी आहे त्या वेतनात समाधान मानावे लागत आहे.
लक्ष्मण सोनार, चालक