लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात शुक्रवार ते रविवार दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केल्या गेल्याने, गुरुवारी शहरात अत्यावश्यक साहित्यासह भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पुढील तीन दिवस भाजीपाला सह इतर मार्केट बंद राहणार असल्याने नागरिकांनी गुरुवारी भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. भाजीपाल्याची मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर देखील बुधवारच्या तुलनेने वाढलेले होते. भाजीपाल्याच्या एकूण दरात किलोमागे १५ ते ३० रुपयांची वाढ झालेली दिसून आली.
गुरुवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेल्या लिलावात देखील भाजीपाल्याचे दर वाढले होते. उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे भाजीपाल्याची आवक काही प्रमाणात कमी झाली होती. त्यातच एकाच दिवशी मागणी वाढल्यामुळे घाऊक बाजारात देखील भाजीपाल्याचे दर चांगलेच भडकलेले होते. बाहेरगावाहून आलेल्या अनेक विक्रेत्यांनी बाजारात मनाप्रमाणे वाढ केली. त्याचाच परिणाम शहरातील भाजीपाला मार्केट वर देखील दिसून आला.
भाजीपाल्याचे दर भाजीपाला - बुधवार चे दर - गुरुवार चे दर
हिरवी मिरची - ३० रुपये - ४० रुपये
कोबी - ३० - ४०
वांगे - ३५ - ४०
बटाटे - २५ - ४५ ते ५०
टमाटे - २५ ते ३० - ४० ते ५०
कोथंबीर - ३० - ४०
वाटाणे - ३० - ४०
रताळू - २५ - ४५
कोट
उन्हाळ्याची चाहूल लागल्याने आता भाजीपाला मिळणे कठीण झाले आहे. त्यातच गुरुवारी भाजीपाला मोठ्या प्रमाणात मागणी होती. तसेच पुढील तीन दिवस देखील भाजीपाला मार्केट बंद राहणार असल्याने, भावात वाढ झाली होती. बाजार समितीत देखील भाव वाढवल्या गेल्याने आम्हाला ही भाव काही प्रमाणात वाढवावे लागले.
-राकेश चौधरी, भाजीपाला विक्रेता