- जिजाबराव वाघ
चाळीसगाव (जि. जळगाव) : श्रीरामपूरहून छत्रपती संभाजीनगरमार्गे चाळीसगावकडे येणारी पिकअप गाडी कन्नड घाटाच्या पायथ्याजवळ संरक्षण कठड्यावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात तीनजण जागीच ठार झाले तर ५ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री ८ वाजता घडला. या वाहनात २० जण होते.
या अपघातात सारजाबाई मधुकर माळी (६५), नाना दामू माळी (पातोंडा दोघे रा. पातोंडा ता. चाळीसगाव) आणि राहुल लक्ष्मण महाजन (गुढे, ता. भडगाव) हे तीन जण ठार झाले आहेत.
पातोंडा येथील अतुल माळी हे परिवारातील २० जणांसह बुधवारी पहाटे वाहनाने श्रीरामपूर येथे गेले होते. नवस फेडण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हे सर्वजण छत्रपती संभाजीनगरमार्गे चाळीसगावकडे येत होते. कन्नड घाटाच्या पायथ्याजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे हे वाहन संरक्षक कठड्यावर धडकले. यात तीन जण जागीच ठार तर पाच जण जखमी झाले. जखमींना तातडीने ग्रामीण व खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत ग्रामीण पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.