जळगाव : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २६ हजार ४६२ वाहनांवर शहर वाहतूक शाखेतर्फे कारवाई करण्यात आली आहे. या वाहनधारकांना ७० लाख ६६ हजार ०५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यापैकी केवळ ३४ लाख ६८ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर ३५ लाख ९७ हजार ९०० रुपये दंड वाहनधारकांकडे थकीत आहे. ही कारवाई जानेवारी ते डिसेंबर या काळात झाली आहे. दरम्यान, ई-चलनामुळे राज्यात आता कुठेही दंड भरता येत असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यांत १४ हजार ५१४ वाहनधारकांनी चार लाख ६८ हजार ९०० रुपयांचा दंड वाहतूक शाखेत भरला आहे. काही दंड जागेवरच वसूल करण्यात आला आहे, तर काही वाहनांचे ई-चलन करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर झाले होते. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने त्यात वाढ करण्यात आली. या काळात अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य कोणत्याच वाहन अथवा व्यक्तीला मुक्तपणे फिरण्यास परवानगी नव्हती. मात्र, तरीदेखील या नियमांचे उल्लंघन करून शहरात वावरणारे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली. त्या-त्या पोलीस ठाण्यांनी या काळात कारवाया केल्या, मात्र त्यासोबत शहर वाहतूक शाखेनेदेखील मोहीम राबवून कारवाया केल्या. वाहन पार्किंग करून निघून जाणे, अथवा इशारा करूनही न थांबणे, कारवाईपासून टाळाटाळ करणे, यावर वाहतूक पोलिसांनी ई-चलनाचा पर्याय अवलंबून एकट्या शहरात २६ हजार ४६२ वाहनांवर कारवाया केल्या. या सर्व वाहनधारकांना घरपोच मेमो पाठविण्यात आले आहेत.