लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या तीन दिवसात शहरातील विविध भागात रस्ते व धुळीच्या प्रश्नावर जळगावकर रस्त्यावर उतरले आहेत. सोमवारी शिवाजीनगरातील नागरिकांच्या संयमाचा बांध सुटला व नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन पुकारले. तब्बल दोन तास आंदोलन करत दोन्ही बाजूकडील वाहने नागरिकांनी अडवून ठेवली.
दररोज धुळीच्या त्रास सहन करणाऱ्या शिवाजीनगरवासीयांनी सोमवारी सकाळी १० वाजता रस्त्यावर उतरून सर्व वाहने अडविण्याचा निर्णय घेतला. स्वयंस्फूर्तीने या भागातील महिला, मुले व तरुण रस्त्यावर उतरले तसेच एकही वाहन या भागातून न जाऊ देण्याच्या निर्णय घेत रस्त्यालगत लाकूड, मोटारसायकल तसेच मिळेल ते साहित्य ठेवून वाहने रोखून धरली. तसेच महापालिका प्रशासनाकडून व सत्ताधारी भाजपकडून हा रस्ता दुरुस्ती करण्यासंदर्भात आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला. दोन तासात कोणताही लोकप्रतिनिधी व मनपाच्या अधिकारी या ठिकाणी हजर न झाल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी या भागातील रहिवाशांनी मनपा प्रशासनाविरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत रस्त्याची दुरुस्ती केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला.
चोपडा, यावल व जळगाव तालुक्यातील वाहतूक खोळंबली
सोमवारी शहरात येणाऱ्या नोकरदार वर्गाचीदेखील वाहने या भागातील नागरिकांनी अडवून ठेवली. तसेच चोपडा, यावल व जळगाव तालुक्यातून येणाऱ्या बसेसदेखील अडविण्यात आल्या. यामुळे अर्ध्या तासातच वाहनांच्या रांगा लागल्या तसेच संपूर्ण वाहतूक खोळंबली. जोपर्यंत मनपा अधिकारी किंवा पदाधिकारी या ठिकाणी येऊन धुळीच्या समस्येपासून व खराब रस्त्याच्या दुरुस्तीचे आश्वासन देत नाही तोपर्यंत एकही वाहन या भागातून न जाऊ देण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला.
जेवणाच्या ताटातही धूळ
अनेक वर्षांपासून या भागातील रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. त्याचा शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यामुळे, संपूर्ण वाहतूक या भागातूनच होत आहे. रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने कोणतेही वाहन या भागातून गेल्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य तयार होत आहे. यामुळे गृहिणींना दिवसभरातून १० वेळा घर साफ करावे लागत आहे. तसेच जेवणाच्या ताटा पासून तर झोपण्याच्या गादीवरदेखील धूळ असल्याने या भागात राहणे आता कठीण झाले असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया या भागातील महिलांनी दिल्या. तसेच शहरातील कोणत्याही भागात गेल्या तरी हीच समस्या कायम राहणार असल्याने मनपा पदाधिकाऱ्यांनी आताच जळगावकरांचा संयमाचा अंत पाहू नये असाही इशारा या भागातील रहिवाशांनी दिला.
महापालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी
महापालिकेमध्ये परिसरातील काही गावांचा समावेश करण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला. मात्र या गावांचा समावेश मनपा हद्दीत करण्यापेक्षा मनपातील काही भागांचा समावेश ग्रामपंचायत हद्दीत करून घ्यायला पाहिजे असाही टोला या भागातील रहिवाशांनी लगावला. महापालिकेपेक्षा एखाद्या गावाची ग्रामपंचायत तरी नागरिकांना सुविधा देईल, अशा संतप्त भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.
उपमहापौरांनाही सुनावले खडे बोल
तब्बल दोन तासानंतर उपमहापौर सुनील खडके यांनी आंदोलकांची भेट घेतली. तसेच आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र जोपर्यंत रस्ते दुरुस्तीचे आश्वासन दिले जाणार नाही तसेच या रस्त्यावर दररोज पाणी मारले जाणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय या भागातील नागरिकांनी घेतला. अनेक नागरिकांनी यावेळी उपमहापौरांनादेखील खडे बोल सुनावत रस्त्यांची समस्या मार्गी लावण्याची मागणी केली. येत्या काही दिवसात या भागातील रस्त्यांबाबत नव्याने निविदा काढून नवीन रस्त्याचे काम केले जाईल, असे आश्वासन उपमहापौरांनी दिले. तसेच दररोज दोन वेळा टँकरने रस्त्यावर पाणी मारले जाईल, असेही आश्वासन उपमहापौर यांनी दिल्यानंतर शिवाजी नगरवासी यांनी आपले आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात जगदीश नागला, विजय बांदल, भगवान सोनवणे, अंकुश कोळी, पंकज पवार, विजय पवार यांच्यासह अनेक महिला व नागरिक सहभागी झाले होते.
स्थायी समितीच्या सभेतही आंदोलनाचे पडसाद
या आंदोलनाचे पडसाद सोमवारी झालेल्या मनपा स्थायी समितीच्या सभेतदेखील उमटले. नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी मनपा प्रशासनाला धारेवर धरत रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करा, अशी मागणी केली. तसेच शिवाजीनगर उड्डाणपुलाचे सुरू असलेले संथ काम वेगात करण्याबाबत मक्तेदाराला सूचना देण्याची ही मागणी दारकुंडे यांनी केली. या भागातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूकदेखील सुरू असल्याने या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे दारकुंडे यांनी सांगितले.