लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गाळेधारकांकडून पुकारण्यात आलेल्या साखळी उपोषणादरम्यान गाळेधारकांनी सोमवारी भाजीपाला विक्री आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान गाळेधारकांनी प्रतिकात्मक स्वरुपात तब्बल ६० हजार रुपये किलो प्रमाणे भाजीपाला विक्रीच्या यावेळी घोषणा दिल्या. तसेच ६० हजार रुपये किलोप्रमाणे भाजीपाला विक्री केला तरी मनपाचे अवाजवी भाडे आम्ही भरू शकणार नाहीत असे या आंदोलनातून गाळेधारकांनी सांगण्याचा प्रयत्न केला. सोमवारच्या आंदोलनात गाळेधारकांच्या कुटुंबीयांनी देखील सहभाग घेतला.
मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांनी आठवडाभरापासून मनपा प्रशासनाविरोधात साखळी उपोषण पुकारले आहे. तसेच दररोज वेगवेगळ्या आंदोलनातून गाळेधारक आपली बाजू मांडून मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सोमवारी गाळेधारकांनी भाजीपाला विक्री आंदोलन केले. गाळेधारकांवर मनपा प्रशासनाकडून होत असलेल्या आंदोलनाची दाहकता जळगावकरांच्या व मनपा प्रशासनाच्या लक्षात यावी यासाठीच हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ.शांताराम सोनवणे यांनी दिली. या आंदोलनात गाळेधारकंसह त्यांच्या कुटूंबातील दिलीप पश्यानी, दिलीप चौधरी, भगवान चौधरी, शाम शिंपी, प्रमोद निकुंभ उपस्थित होते. रवी बारी, किशोर सोनवणे, नितीन हेमनानी, रमेश हेमनानी, अमोल वाणी यांनीही सहभाग घेतला. सोमवारी देखील शहरातील गाळेधारकांच्या साखळी उपोषणाला विविध संघटना संस्थांनी आपला पाठिंबा दर्शविला. दरम्यान, मंगळवारी गाळेधारक भजी तळा आंदोलन करणार आहेत.