लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : मंगळवारपासून दररोज इयत्ता ९ वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार शाळेत घंटा वाजली असली तरी विद्यार्थ्यांचा मात्र प्रतिसाद अत्यल्प असल्याने वर्ग कसे भरवावेत? असा प्रश्न मुख्याध्यापक आणि शिक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.वर्गात ५५ ते ६० मुले असतील तर केवळ पाच ते सात विद्यार्थी शाळेत आले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्यांना कोरोना प्रादूर्भाव होईल. म्हणून पाठविण्यास तयार नसल्याचे शाळांना कळविले आहे. म्हणून शाळा भरणे शासनाने सक्तीचे केले असले तरी मात्र स्थानिक स्तरावर विद्यार्थ्यांनी अजूनही शाळेकडे पाठ फिरविली आहे.ज्या शाळांमध्ये पाच पाच तुकड्या एका वर्गाच्या आहेत, त्या शाळेत कोरोनाचे नियम पाळून शाळा भरविणे अवघड झाले आहे. एका वर्गात केवळ २५ विद्यार्थी बसू शकतात तर मग चार तुकड्या असतील तर त्यासाठी या विद्यार्थ्यांना आठ वर्गात सोशल डिस्टन्स पाळून बसविले जाईल आणि एकच शिक्षकाला एकच टॉपिक आठ वेळा शिकवावे लागेल म्हणून नियमित शाळा सुरू होईल तरच शाळा सुव्यवस्थित भरतील अन्यथा शाळा प्रशासनास अडचणींचा सामोरा करावा लागेल, असे म्हटले जात आहे.