एरंडोलचे वीरजवान राहुल पाटील यांच्या कुटुंबाला मदत
जळगाव : पंजाब येथे भारत पाकिस्तान सीमेवर देशसेवा करीत असताना एरंडोल येथील सीआरपीएफ जवान राहुल लहू पाटील यांना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या कुटुंबीयांना आर्या फाउंडेशनतर्फे ६५ हजाराची मदत करण्यात आली. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.धर्मेंद्र पाटील यांनी वीरमाता संगीता पाटील यांच्या नावाचा धनादेश कुटुंबीयांना सुपूर्त केला. या वेळी सुखकर्ता फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर उपस्थित होते. डॉ.पाटील यांनी कुटुंबियांना भविष्यात देखील मदतीचे आश्वासन दिले. वीर जवान राहुल यांची आई संगीता, भाऊ गोपीनाथ, बहीण योगिता हजर होते.
संस्कार भारतीतर्फे विविध उपक्रम
जळगाव : भरतमुनी जयंती मराठी भाषा गौरव दिनानिमित्त संस्कार भारतीतर्फे ऑनलाईन विविध उपक्रम घेण्यात आले. या वेळी तुझी वाट वेगळी या संगीत नाटकातील वंदन नटेश्वरा ही नांदी दिलीप चौधरी, दिव्या चौधरी, श्रुती वैद्य, सुरभी शर्मा, अनुजा मंजूळ यांनी सादर झाली. नीळकंठ कासार यांनी तबल्यावर साथ दिली. दुष्यंत जोशी, गणेश सोनार, ओमप्रकाश शर्मा, ज्योती राणे, वैभवी कुलकर्णी, प्रमोद वैद्य, पूर्वा कुलकर्णी यांनीही सादरीकरण केले. अध्यक्ष किशोर सुर्वे, नाट्यविभाग प्रमुख चिंतामण पाटील यांनी परिश्रम घेतले.
तपासणी शिबिर
जळगाव : जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतपेढीतर्फे शिक्षकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. अध्यक्ष एस.डी. भिरुड, डॉ. दिलीप राणे, डॉ. तेजस राणे, माधुरी राणे, जयंत चौधरी, अरुण सपकाळे, साधना लोखंडे, डिगंंबर पाटील, शुभांगी महाजन आदी उपस्थित होते. शिबिरात १३२ शिक्षकांची तपासणी करण्यात आली.