तीन निष्पाप लहान मुलांचा बळी
गेल्या दोन, तीन वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात तीन निष्पाप लहान मुलांचा खून झाला आहे. यात विशेष म्हणजे, खून करणाराही १९ वयोगटांतीलच मुलगा आहे. अल्पवयीन असतानाच तो गुन्हेगारीकडे वळला. भोकर, ता.जळगाव, भडगाव व यावल तालुक्यातील डांभुर्णी या ठिकाणी या मुलाने लहान मुलांचा खून केला होता. इतकेच काय, एका प्रकरणात अनैसर्गिक प्रकार केल्याचेही निष्पन्न झाले होते. काही दोष नसलेल्या मुलांचा या घटनांमध्ये बळी गेला होता.
एकूण किती बेपत्ता -
मुले - ६५८
मुली - १७७
८५ टक्के मुलींचाच लागला शोध
जिल्ह्यात २०२० या वर्षात १७७ मुली बेपत्ता झाल्या आहेत, त्यापैकी १५२ मुलींचा शोध लागलेला आहे. उर्वरित गुन्हे तपासावर असून, अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. जिल्ह्यात ८५ टक्के मुलींचा शोध लागलेला आहे. कोरोना काळात शाळा, महाविद्यालय, क्लासेस बंद होते, त्याशिवाय बाहेर फिरायला अनेक निर्बंध असल्याने अल्पवयीन मुली घरातच लॉक झाल्या होत्या, तरीही मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनकच आहे. दरम्यान, दीड वर्षात जिल्ह्यातून मुलींसोबतच ६५८ मुलेही बेपत्ता झाली आहेत. त्यात १८ वर्षांच्या आतील ६५ मुलांचा समावेश आहे. बेपत्ता झालेल्यापैकी ३२३ मुलांचा शोध लागलेला आहे.
अल्पवयीन मुलांबाबत अपहरणाचे गुन्हे दाखल
अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी घरातून निघून गेली असेल किंवा हरवली असेल, तरी नवीन कायद्यानुसार अशा प्रकरणात आता अपहरणाचा गुन्हा दाखल होतो. त्यात मुलगी एखाद्या मुलासोबत पळाली असेल, तर पोक्सोचे वाढीव कलम लागले. बहुतांश प्रकरणात मुलांवरच गुन्हे दाखल झालेले आहेत. मुलींवर गुन्हे दाखलचे प्रमाण जिल्ह्यात तरी नाही. वैद्यकीय तपासणीनंतर आणखी कलमात वाढ झालेली आहे, असे अनेक किस्से जिल्ह्यात घडलेले आहेत. शनी पेठ व एमआयडीसी या दोन पोलीस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वीच असे गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यात आरोपींना अटकही झालेली आहे.