जळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवू असे आव्हान जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व राष्ट्रवादी काँगेसचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी एकमेकांना दिले. मतदान हे मतपत्रिकेवर घ्या, असे आमदार पाटील यांचे म्हणणे आहे तर मतपत्रिका काय, बोट उंचावून मतदान घेऊ, असे प्रतिआव्हान महाजन यांनी दिले.जिल्हा नियोजन विकास समितीची (डीपीडीसी) १९ रोजी बैठक झाली त्या वेळी आजी- माजी पालकमंत्र्यांनी एकमेकांना हे आव्हान दिले. आमदार डॉ. पाटील यांनी बोलण्यास सुरुवात केली त्या वेळी महाजन म्हणाले की, मला वाटलं.. विरोधी पक्ष झोपला आहे का?, त्यावर डॉ. पाटील यांनी महाजन यांना उद्देशून आपली ही सभा शेवटची सभा आहे, पुढेच ‘तो’ ठरवेल, असा उल्लेख केला. त्यावर शेवटची तुमची आहे, असा टोला महाजन यांनी डॉ. पाटील यांना मारला.डॉ. पाटील यांनी ही माझी शेवटची सभा नाही, मी येथे पुन्हा येऊन दाखवेल, असे सांगत थेट तुमच्या मतदार संघातून मी निवडून येऊन दाखवितो व तुम्ही माझ्या मतदार संघातून निवडून येऊन दाखवा... शेवटची सभा कोणाची आहे, हे ‘तो’ ठरवेल, मात्र ‘तो’ म्हणजे ईव्हीएम नाही, असे डॉ. सतीश पाटील यांनी सांगत मतदपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी केली. त्यावर महाजन म्हणाले, ते मी ठरवू शकत नाही. मात्र मतपत्रिका काय, तुम्ही बोट उंचावून सांगा, तसे मतदान घेऊ.यावर ‘हे नाना पटोलेंचे आव्हान समजू नका’ असेही सांगायला पाटील विसरले नाही. त्यावर महाजन यांनी नाना पटोलेंसारखे नंतर बदलू नका, असा टोला लगावला.त्यानंतर डॉ. पाटील हे सभेतून जात असताना ‘मी निवडून येऊन दाखवितोच, अन्यथा नावापुढे ‘भास्करराव’ नाव (वडिलांचे नाव) लावणार नाही, असे सांगून टाकले.आव्हान स्वीकारतो- महाजनबैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, केवळ गमतीचा भाग होता, मात्र सतीश पाटील यांनी ते गंभीररित्या घेतले. असे असले तरी त्यांचे हे आव्हान मी स्वीकारत असल्याचे ते म्हणाले.