जळगाव : आग का दरिया हे और डूब के जाना है ! संघर्षातून प्रेम अधिक बहरते, असे म्हटले जाते...आणि याचा अनुभव प्रत्यक्षात घेतला तो जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कुरकुरे आणि परिचारिका सविता कुरकुरे यांनी...वैद्यकीय सेवेतील या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि संघर्षावर मात करीत या खऱ्या प्रेमाचा विजय झाला.
डॉ.विजय कुरकुरे हे वैद्यकीय अधिकारी म्हणून २००७ मध्ये जिल्हा रुग्णालयात रूजू झाले. त्यावेळी सविता कुरकुरे या परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. रुग्णाच्या सॅम्पल घेण्यावरून झालेल्या गैरसमजातून मैत्रीत रुपांतर झाले..हळू-हळू मने जुळली, त्यानंतर अनेक दिवस प्रेमाचा संघर्ष सुरूच होता आणि ८ मार्च २०११ मध्ये दोघांनी एका मंदिरात लग्नगाठ बांधली. लग्नानंतर आता कुटुंबीय अगदी जिव्हाळ्याने आपुलीकीने वागतात, आम्हाला दोन मुली असून मला अपेक्षित सन्मान, प्रेम, या सर्व बाबी कुटुंबात मिळतात, संघर्ष केला मात्र, त्याचे फळ मिळाले, अशा भावना सविता कुरकुरे यांनी मांडल्या.
मैत्रीदिनापासून प्रेमाला सुरूवात
डॉ. कुरुकुरे यांनी मैत्री दिनी सविता यांना देण्यासाठी एक चॉकलेट आणले हाते. मात्र, ती चॉकलेट देता न आल्याने तीन दिवस ती वितळून गेली होती. अखेर सविता कुरकुरे या फोन करण्यासाठी गेल्यावर त्यांनी स्वत:हून ते चॉकलेट स्वीकारले आणि येथून या खऱ्या प्रेमाची सुरूवात झाली.
रुग्णसेवेला प्राधान्य
लग्नानंतरही डॉ. विजय कुरकुरे आणि सविता कुरकुरे या जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. मात्र, या ठिकाणी आपले नाते विसरून रुग्णसेवेला प्राधान्य एकमेकांना डॉक्टर आणि परिचारिका यांच्याप्रमाणेच सन्मान देणे या बाबी आम्ही कटाक्षाने पाळतो. आमच्याशी संवाद साधणाऱ्या समजतही नाही की आम्ही पती -पत्नी आहोत ते...असे सविता कुरकुरे यांनी सांगितले.