ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 17- महामार्ग व राज्य मार्गावर दारुबंदी झाल्याचा गैरफायदा घेत चाळीसगाव शहराला लागून एका शेतात तिघांनी सुरू केलेला बनावट दारुचा कारखाना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उद्ध्वस्त केला. यात दारु बनविण्याचे साहित्य, स्पिरिट, रिकाम्या बाटल्या, बुच, पॅकींग मशीन यासह 1 लाख 11 हजार 535 रुपयांची बनावट दारु हस्तगत करण्यात आली आहे. बाजारात विक्रीला जाण्याआधीच हा साठा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेशसिंह चंदेल उपस्थित होते.चाळीसगाव शहरात बायपास रस्त्यावर पाटणा देवी फाटा ते कन्नड फाटा या दरम्यान एका पडीत शेतात तीन जण बनावट देशी व विदेशी दारु निर्मिती करीत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक डॉ. सुपेकर यांना मिळाली होती. त्यानुसार सुपेकर यांनी अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक चंदेल यांना पाळत ठेऊन पथकाद्वारे कारवाईचे आदेश दिले होते. उपनिरीक्षक प्रकाश इंगळे, हेडकॉन्स्टेबल दिलीप येवले, अशोक चौधरी, मंगलसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, सतीष हळणोर, रवींद्र घुगे, रमेश चौधरी, रवींद्र गायकवाड, मिलिंद सोनवणे,गफ्फार तडवी, प्रकाश महाजन, दत्तात्रय बडगुजर, महेश पाटील, योगेश पाटील, मनोज दुसाने,सुशील पाटील, दीपक पाटील व प्रवीण हिवराळे आदींच्या पथकाने दोन दिवस पाळत ठेऊन सापळा यशस्वी केला.मालेगावचा फिरोज मास्टरमाईंडबनावट दारु तयार करुन ती हॉटेल,ढाब्यावर विक्री करायची याचे नियोजन फिरोजखान अहमदखान (वय 30 रा.मालेगाव) याने केले होते. चाळीसगाव परिसरातून सगळीकडे माल पोहचविणे सहज सोपे होईल या उद्देशाने त्याने चाळीसगाव हे ठिकाण निवडले व त्यासाठी स्थानिक नदीमखान शाबीरखान (वय 23) व शाहरुख शेख रफिक शेख (वय 24) या दोघांची मदत घेतली.बनावट देशी दारुसाठी लागणारे स्पीरीट (इसरा),विदेशीसाठी लागणारे रसायन, रंग आदी साहित्य फिरोजखान याने मध्यप्रदेशातून आणले होते. विविध देशी व विदेशी ब्रॅँडच्या रिकाम्या बाटल्या, बूच, पॅकींग मशीन, पातेले, शुध्द पाणी आदी साहित्य घेऊन दोन दिवसापूर्वीच कारखाना थाटला होता.
https://www.dailymotion.com/video/x844vqx