जामनेर : ग्रामपंचायत निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी जामनेर येथून रवाना झालेल्या कार्यकर्त्यावर विरोधकांचे बारीक लक्ष असल्याने नेरी येथे एका कार्यकर्त्याची ग्रामस्थांनी चांगलीच धुलाई केली. या मारहाणीचा व्हिडीओ दिवसभर सोशल मीडियावर फिरत होता. वाकोद येथे पैसे वाटणारे आल्याची माहिती मिळताच विरोधकांनी त्यांचा पाठलाग केल्याने पैसे वाटणारे पुढे पळत होते तर त्यांचे मागे विरोधक पळत होते, असे चित्र पाहावयास मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गेल्या काही वर्षात सर्वच निवडणुकीत पैसे वाटून मतदान करवून घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे. निवडणूक सहकारी संस्थेची असो की नगरपालिका, ग्रामपंचायतीची पैसे वाटले जातात या अपेक्षेने मतदारदेखील एक दिवस आधी त्यांची वाट बघत असतात. स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या गावात जामनेर येथून मोठ्या प्रमाणात रसद पुरविली गेली. नेरी, पहूर, फत्तेपूर, वाकोद, तोंडापूर, गोद्री, मोयगाव बुद्रूक, लहासर येथे एका माता साठी ५०० ते ५००० रुपये वाटले गेल्याची दिवसभर चर्चा होत होती.यंदाच्या निवडणुकीत काहीही झाले तरी पैसे वाटू देणार नाही, असा निर्धार विरोधकांनी केल्याने सर्वच ठिकाणचे कार्यकर्ते जागरूकतेने पहारा देत होते. नेरी येथे पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्याला विरोधी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला व मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. प्रशासनातील निवडणूक विभागाने अशा कृत्यांना पायबंद घालण्यासाठी कारवाई करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
नेरी येथील कार्यकर्त्याच्या धुलाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 3:15 PM