लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : सर्वोदय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी विकास पंडितराव पाटील यांची तर सचिवपदी उदेसिंग मोहन पाटील यांच्यासह उपाध्यक्षपदी प्रशांत मुरलीधर पाटील, सहसचिवपदी सुरेश श्रीपतराव सोनवणे यांची सोमवारी सायंकाळी ५ वाजता नुतन संचालक मंडळाच्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंग गवळी यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
गिरणा खोऱ्यातील शिक्षण गंगोत्री अशी ओळख असणाऱ्या सर्वोदयची निवडणुक प्रक्रिया दोन मे रोजी पार पडली. तीन रोजी निकाल जाहिर झाले. विद्यमान सत्ताधाऱ्यानाच मतदारांनी कौल देतांना विरोधकांचा धुव्वा उडवला होता. रामराव जिभाऊ पाटील व उदेसिंह पवार स्मृती पॕनलने पूर्ण १९ जागा जिंकत संस्थेवरील आपले वर्चस्व घट्ट केले आहे. अध्यक्ष आणि सचिव यांना पुन्हा संधी मिळाली आहे. उपाध्यक्ष व सहसचिवपदासाठी नव्या - जुन्यांचा मेळ साधण्यात आला आहे. निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संचालकांनी आनंद व्यक्त केला. नवनियुक्त पदाधिका-यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. निवडीच्यावेळी नरसिंग हाटेसिंग पाटील, संजय संतोष पाटील, भगवान अमरसिंग पाटील, आनंदा फकिरा पाटील, भाऊसाहेब भिकनराव जगताप, इंद्रसिंग उदेसिंग पवार, उमेश प्रकाश करपे, प्रविण भिकन पाटील, राजेंद्र महारु पाटील, योगेश नीळकंठ भोकरे, अशोक परमेश्वर चौधरी, नेताजी कैलास हिरे, वर्षा नाना कोळी, अनिता नितिन पाटील, साधना शामकांत निकम आदी नुतन संचालक उपस्थित होते.
नव्या-जुन्यांचा साधला मेळ
अध्यक्ष व सचिवपदी अनुक्रमे विकास पाटील, उदेसिंग पाटील यांची फेरनिवड झाली आहे. उदेसिंह पवार यांच्या निधनानंतर विकास पाटील यांची २०१९मध्ये अध्यक्षपदी निवड केली गेली. सचिवपदी निवड झालेले उदेसिंग पाटील यांचीही प्रकाश पाटील यांच्या निधनानंतर याच पदावर निवड झाली होती.
उपाध्यक्षपदी निवड झालेले प्रशांत मुरलीधर पाटील हे गत संचालक मंडळात पहिल्यांदा निवडून आले. ते रामराव जिभाऊ पाटील यांच्या कुटूंबातील असून त्यांच्यासाठी ज्येष्ठ संचालक नरसिंग हाटेसिंग पाटील यांनी माघार घेत त्यांच्या निवडीची वाट सुकर केली. प्रशांत पाटील हे राष्ट्रीय सह. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व चाळीसगाव महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. एम.बी.पाटील यांचे सुपूत्र आहे.
भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष आणि संस्थेचे ज्येष्ठ संचालक सुरेश श्रीपतराव सोनवणे यांच्या गळ्यात सहसचिवपदाची माळ पडली.