जिल्ह्यात ४०४ गावे तंटामुक्त : योजनाच बासनात
जळगाव : दिवंगत गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली तंटामुक्त गाव योजना जळगाव जिल्ह्यात कागदावरच आहे. परिणामी गावाच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येऊ लागल्या आहेत. त्यामुळे तंटामुक्त गाव योजना ही कागदावरच राहिल्याचे अधोरेखित होत आहे.
जळगाव जिल्ह्यात ११५१ गावे असून २०१६-१७ मध्ये ११४८ गावांनी तंटामुक्त गाव योजनेत सहभाग घेतला होता. त्यानंतर २०१७-१८ मध्ये सर्वच ११५१ गावांनी या योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी ४०४ गावे तंटामुक्त झाली होती. त्यानंतर ही योजना बासनात गुंडाळण्यात आली. तंटामुक्त गावांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात येऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातील ३५ पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारींपैकी ७० टक्के तक्रारी या ग्रामीण भागातीलच आहेत. त्यात मग शेजाऱ्यांचा वाद असो, कौटुंबिक किंवा शेतीवरून वाद आदी कारणे आहेत. यामुळे तक्रारदार यांचा वेळ व पैसा खर्च होत आहे. न्यायालयाचेही खेटे मारावे लागत आहेत. ही योजना सुरू झाली तर किमान गावाच्या तक्रारी गावातच मिटतील, याच उद्देशाने दिवंगत गृहमंत्र्यांनी योजना सुरू केली होती.
*तंटामुक्त गावांना भरघोस बक्षिसे*
शासनाने तंटामुक्त गाव योजना जाहीर केली तेव्हा तंटामुक्त झालेल्या गावांना लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर केली, इतकेच नाही तर जिल्हा पातळीवर वर्षातून एकदा कार्यक्रम घेऊन या गावांना बक्षिसेही देण्यात आली होती. या बक्षिसातून गावांमध्ये लोकहिताची कामे केली जात होती. आता मात्र ना योजनांना, ना बक्षीस अशी स्थिती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.
कोट...
तंटामुक्त योजना सुरू असायला हवी. आमच्या गावातून अंतर्गत वादाचे एकही प्रकरण पोलीस ठाण्यात गेलेले नाही. चोरीच्या घटनांचीच नोंद पोलीस ठाण्यात झालेली आहे. गावातील वाद गावातच मिटविण्यात आले आहेत.
- धनराज वसंत पाटील, अध्यक्ष, तंटामुक्त समिती, जळके
कोट...
गेल्या दहा वर्षांपासून एकही प्रकरण पोलीस ठाण्यात गेलेले नाही. साधी अदखलपात्र गुन्ह्याची नोंददेखील झालेली नाही. गावात तशा वादाच्या घटना घडलेल्या नाहीत. झाल्याच तर आपसात मिटविल्या जातात.
- आनंदा भिका गोपाळ, अध्यक्ष, तंटामुक्त समिती, जवखेडा, ता.जळगाव
जिल्ह्यातील एकूण तंटामुक्त गावांची संख्या : ४०४
तालुका. २०२० दाखल तक्रारी
जळगाव - २९
अमळनेर- ३६
भुसावळ - २५
यावल - २१
रावेर - ३१
मुक्ताईनगर- २७
चोपडा- ३३
जामनेर- ३६
चाळीसगाव -४१
पाचोरा- ३१
भडगाव- १९
पारोळा- २६
एरंडोल- २६
धरणगाव-१४
बोदवड- ०९