ज्याप्रमाणे तुमचे-आमचे गाव असते, त्याचप्रमाणे देवाचेही गाव आहे .त्या गावाचे नाव ‘वैकुंठ लोक’ आहे. आपण त्या ठिकाणी जाण्याबद्दल एवढ्याच करिता उत्सुक असायला हवे कारण आपणही तेथूनच आलो आहोत. थोडक्यात म्हणजे जे देवाचे गाव आहे तेच आपलेही मूळगाव. म्हणून स्वत:च्या गावाला जाण्याविषयी उत्सुकता असण्यात काहीच गैर नाही परंतु विचित्र परिस्थिती अशी दिसून येते की बहुतेक लोकांना जीवनाचे ध्येय काय आहे, हेच माहीत नाही.आपल्या जीवनाचे ध्येय पुन्हा एकदा भगवद् धर्मात जाणे हे आहे, पण लोकांना वैकुंठ लोकातील आपल्या खऱ्या घराबद्दल काहीच कल्पना नाही. आधुनिक मानवाने ज्ञानाच्या क्षेत्रात कितीही प्रगती केली असली तरी वैकुंठ लोकांबद्दल त्याला काहीच ज्ञान नाही. जर कोणाचा मृत्यू झाला तर आपण तो स्वर्गवासी झाला असे म्हणतो पण तुम्हाला वैकुंठात जायचे आहे का? असे जर कोणाला विचारले तर तो कदाचित, काय भलतेच अभद्र बोलता, असेही म्हणेल.पुण्यसंचयच्या जोरावर जरी एखाद्याने या ब्रम्हांडातील सर्वोच्च ग्रहावर प्रवेश मिळविला तरी पुण्य क्षीण होताच त्याला परतीची वाट धरावी लागेल. ज्याप्रमाणे एखादी अंतराळ यान आकाशात खूप उंच गेले असले तरी इंधन संपताच त्याला पुन्हा खाली यावे लागते. आयुष्यात इतकी दु:खे संकटे व क्लेश पाहून एखादा म्हणेल की खरे सुख प्रेम किंवा आनंद कुठेच अस्तित्वात नाही का?याचे उत्तर असे आहे की खरा आनंद किंवा खरे प्रेम निश्चितच अस्तित्वात आहे परंतु ते तुम्ही चुकीच्या ठिकाणी शोधत आहात. एकदा एक मनुष्य रस्त्यावरील दिव्याखाली काहीतरी शोधत होता, हे पाहून त्याच्या मित्राने विचारले, काय रे काहीतरी हरवले आहे का? यावर पहिल्याने उत्तर दिले, होय, माझी सोन्याची अंगठी बाजूच्या बागेत कुठेतरी पडली आहे, ती शोधत आहे हे एकूण मित्र म्हणाला, अरे मुर्खा अंगठी पडली असली तरी येथे रस्त्यावर ती कशी काय मिळेल? तेव्हा पहिल्याने उत्तर दिले ,पण, इथे प्रकाशात मी नीट पाहू शकतो ; बागेत तर खूपच अंधार आहे. यातील विनोदाचा भाग सोडला तर आपले सध्याचे जीवन पहिल्या मनुष्याच्या विक्षिप्त वागण्यासारखेच आहे भौतिक व्यक्तीच्या झगमगाटात आपण खº्या सुखाचा शोध घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करीत आहोत. पण जिथे आपल्याला खरे प्रेम व सुख लाभेल त्याविषयी आपल्या हृदयात दाट अंधकार आहे.- चैतन्य जीवन दास (अध्यक्ष, इस्कॉन जळगाव)
देवाचे गावच आपले मूळगाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:50 AM