सुनील पाटील
जळगाव : जळगाव जिल्हा हा गावठी पिस्तूल तस्करीचे मुख्य केंद्र बनला असून या जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यात पिस्तूलची तस्करी केली जात असल्याचे उघड झाले आहे. महामार्गाचे जाळे, मध्य रेल्वेचे माहेरघर असलेले भुसावळ, वाढती गुन्हेगारी व पिस्तूल निर्मितीचे उमर्टी हे ठिकाण जिल्ह्याला लागूनच असल्याने तस्करी जाळे विस्तारले आहे. गेल्या पाच वर्षात पोलिसांनी १७६ गावठी पिस्तूल व २२० काडतूस पकडले असून २३२ आरोपींना अटक केलेली आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या पायथ्याशी डोंगराळ वस्तीत उमर्टी नावाचे दोन गावे वसलेली असून एक गाव जळगाव जिल्ह्यात तर दुसरे गाव मध्य प्रदेशात येते, दोघं गावांमध्ये जाण्यासाठी फक्त नदी आडवी येते. मध्य प्रदेशात येणाऱ्या उमर्टीत ठिकठिकाणी पिस्तूलची निर्मिती केली जाते. पिस्तूल तयार करणाऱ्या लोकांचे जिल्ह्यात दलाल व गुन्हेगारांशी थेट संपर्क असल्याने त्यांच्या माध्यमातून पुणे, मुंबईसह राज्यात व शेजारच्या गुजरातमध्ये पिस्तूल रवाना केले जातात. उमर्टी हे गाव मध्य प्रदेशात येत असले तरी त्याचा दैनंदिन व्यवहार हा जळगाव जिल्ह्यातच होतो. यावल-चोपडा या मार्गाने कार, दुचाकीने तर भुसावळ येथून रेल्वेने देशभरात पिस्तूलची तस्करी होते. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या दोन राज्यातूनही गावठी पिस्तूलची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. पाच वर्षांच्या आकडेवारी यावर नजर टाकली असता अलीकडच्या काळात पिस्तूलची तस्करी वाढल्याचे सिद्ध होत आहे.
दरम्यान, यात सर्वाधिक पिस्तूल हे स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डवरील ही आकडेवारी असली प्रत्यक्षात पिस्तूलचा हा आकडा यापेक्षाही जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी पकडलेले हे सर्व पिस्तूल दरोडा, घरफोडी व रस्ता लूट प्रकरणातील रेकॉर्डवर असलेल्या आरोपींकडेच आढळून आले आहेत. घटना घडल्यानंतर किंवा घटनेच्या आधीही हे पिस्तूल पकडण्यात आलेले आहेत. २०१९ व २०२० या दोन वर्षात सर्वाधिक ११३ पिस्तूल पोलिसांनी पकडले आहेत. हे सर्व पिस्तूल मध्य प्रदेशातील उमर्टी या गावातून आलेले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दहा हजारांपासून पिस्तूल उपलब्ध
उमर्टी येथे तयार झालेले पिस्तूल हे दहा हजारांपासून ते ३० हजारांपर्यंत मिळतात. उत्तर प्रदेशातील पिस्तूलचे दर हे अधिक आहेत. गुन्हेगारांमार्फतच हे पिस्तूल मिळतात. उमर्टी या गावात तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याचेही प्रसंग आहेत. त्यामुळे येथे जातांना जळगाव पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांची मदत घेतली आहे. पोलिसांनी पकडलेल्या या गावठी पिस्तूलचा वापर रस्ता लूट, खून, दरोडा या सारख्या गुन्ह्यात झालेला आहे. एक पिस्तूल तर पोलिसानेच उमर्टी येथून आणल्याचे निष्पन्न झाले होते.
असे आहेत वर्षनिहाय पकडलेले पिस्तूल
वर्ष आरोपी पिस्तूल काडतूस
२०१६ २५ १६ २५
२०१७ ३२ ३० ३६
२०१८ १९ १७ २१
२०१९ ७१ ५४ ५७
२०२० ८५ ५९ ८१
एकूण २३२ १७६ २२०