अमळनेर : कोरोनाच्या काळात शाळा बंद... ऑनलाइन शिक्षणाला अनेक अडचणी... मुलांची शिस्त बिघडणार... म्हणून तालुक्यातील निंभोरा येथील युवकांनी एकत्र येत युथ फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील भिंती विविध माहितीने रंगवल्याने मुलांना गल्लीत खेळता खेळता ज्ञान मिळू लागले.
मुले चंचल असतात. त्याबरोबरच त्यांची अध्ययन क्षमता अधिक असते. कोरोनाने शिक्षणात अडचणी निर्माण केल्या म्हणून काय झाले, त्यावर मात करण्यासाठी श्रीकृष्ण धनगर याच्या संकल्पनेतून त्याने मिलिंद पाटील, परेश धनगर, मुन्ना धनगर, मयूर पाटील, आदित्य पाटील, दीपक कदम, सागर पाटील, मयूर धनगर, नूतन वाडेकर, जयेश कोळी, मनीष पाटील, चैतन्य पाटील, मयूर कोळी, अक्षय कोळी या तरुणांना एकत्र बोलवत लोकसहभागातून गावात ज्ञान साकारण्याबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनी पैसे जमा करून जिल्हा परिषदेचे शिक्षक ज्ञानेश्वर कुवर यांचे मार्गदर्शन घेतले.
पेंटर परेश भावसार व प्रशांत मालुसरे यांच्याकडून भिंती रंगवल्या. भिंतींवर सूर्यमाला रंगवून ग्रहांची माहिती दिली. गणितातील सूत्रे रंगवली. विज्ञानातील शरीराच्या विविध अवयवांची ओळख दिली. इतिहासातील शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ, मराठीतील व्याकरण, इंग्रजी वर्णाक्षरे, शब्द व वाक्य रचना, नागरिक शास्र, भौगोलिक नकाशा, भौमितिक आकृत्या, पृष्ठफल, घनफळ या संकल्पना त्यांनी चित्रातून मांडल्या.
मुले खेळताना, बागडताना रस्त्यात, गल्लीत त्यांच्या नजरेस चित्रे पडू लागली. त्यामुळे ते त्याकडे आकर्षित होऊन अभ्यास करू लागली. पाढे पाठ करू लागली.
एकीकडे बिघडणारी तरुणाई पाहता निंभोरा गावचे संस्कार चांगले असल्याने तरुणांनी आपली भावी पिढी बिघडू न देता घडवण्यासाठी प्रयत्न केले. तहसीलदार मिलिंद वाघ, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, सरपंच पायल पाटील, उपसरपंच आलेश धनगर, बाजार समितीचे माजी संचालक सुरेश पाटील, समाधान धनगर, प्रा. सुनील पाटील यांच्या उपस्थितीत ज्ञानाच्या भिंतींचे लोकार्पण करण्यात आले.
===Photopath===
170621\17jal_3_17062021_12.jpg
===Caption===
गाव तसं चांगलं ...ज्ञानानं रंगलं !