जळगाव : मतदानानंतर गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारांसह गावकऱ्यांना प्रतीक्षा असलेला क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून ग्रामपंचायत निवडणुकीतील अंतिम टप्पा सोमवार, १८ जानेवारी रोजी पूर्ण होत आहे. यामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींची मतमोजणी पूर्ण होऊन गावकारभारीही ठरले जाणार आहेत. मतमोजणीचीही तयारी पूर्ण झाली असून रविवारी प्रशिक्षणदेखील देण्यात आले. शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायतीपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून १० टेबलांवर एकूण १८ फेऱ्यांत मतमोजणी केली जाणार आहे. यामध्ये सर्वांत शेवटी अठराव्या फेरीत कडगाव, मन्यारखेडा, तरसोद, रिधूर या ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे.
तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी १५ रोजी मतदान झाल्यानंतर सोमवार, १८ जानेवारी रोजी नूतन मराठा महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी १० टेबलांवर १८ फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायतीपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये पहिला निकाल अर्ध्या तासात म्हणजेच सकाळी साडे दहा वाजता समोर येण्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व ४० ग्रामपंचायतींचे निकाल स्पष्ट होण्याचा अंदाज आहे.
मतमोजणी प्रशिक्षण
मतमोजणीपूर्वी रविवार, १७ जानेवारी रोजी तहसीलदार नामदेव पाटील यांनी प्रशिक्षण दिले. यामध्ये मशीन कसे सुरू करावे, सील कसे उघडावे, नोंदी कशा घ्याव्या, अशी मतमोजणीविषयी सर्व बाबींची माहिती देण्यात आली. मतमोजणीसाठी १० पथके व दोन राखीव पथके नियुक्त करण्यात आली असून एका पथकात एक मतमोजणी पर्यवेक्षक व दोन सहायक असे तीन जण राहणार आहेत. मतमोजणीसाठी एकूण ५० हून अधिक जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्रावर तंत्रज्ञ कार्यरत राहणार
मतमोजणीच्या ठिकाणी मतदान यंत्रात काही तांत्रिक बिघाड झाल्यास या ठिकाणी तंत्रज्ञ राहणार आहेत.
अशी होणार मतमोजणी
- स्ट्राँग रूममधून कोतवाल मतदान यंत्र आणणार
- आणलेल्या यंत्राचा क्रमांक तपासला जाणार
- उमेदवार अथवा प्रतिनिधीला तो क्रमांक दाखवून मतदान यंत्र सीलबंद आहे की नाही याची खात्री करून सही घेतली जाणार
- मतदान यंत्र सुरू (ऑन) केले जाणार
- एकूणचे बटण दाबून झालेल्या मतदानाची आकडेवारीची खात्री करणार
- निकालचे (रिझल्ट) बटण दाबून उमेदवारांना मिळालेल्या मतदानाची नोंद घेणार.