भुसावळ : तालुक्यातील कोरोना रुग्णांची स्थिती जवळपास १०० टक्के आटोक्यात आली असून, मात्र कोरोनाच्या नावाखाली ग्रामसभा अद्यापही होत नाही. यामुळे गावातील ज्वलंत समस्या सुटणार कशा, हा प्रश्न आता उभा ठाकला आहे.
१५ ऑगस्ट रोजी गावात ग्रामसभा घेऊन त्यामध्ये पुढील वर्षीचे गावाच्या विकासाचे तसेच आर्थिक नियोजन करण्यात येते; मात्र कोरोनामुळे ग्रामसभा घेण्यास मनाई आहे. त्यामुळे या वर्षी ग्रामसभा घ्यायच्या की नाही, याबाबत गावकरी शासन निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत.
१५ ऑगस्ट रोजी गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात येते. या ग्रामसभेत गतवर्षी आढावा घेण्यात येतो. तसेच पुढील वर्षीचे आर्थिक नियोजनही करण्यात येते. पुढील गावात करावयाची विकासकामे तसेच त्याकरिता लागणारा निधी याचे नियोजन करण्यात येते. कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ कुणाला द्यायचा, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावात कोणती विकासकामे करायची, याचे नियोजन या ग्रामसभेत करण्यात येते. त्यामुळे ही ग्रामसभा गावाच्या विकासासाठी महत्त्वाची असते. त्यामुळे या वर्षी ग्रामसभा घेण्याची परवानगी मिळते की नाही, या निर्णयाच्या प्रतीक्षेत गावकरी आहेत.
ग्रामपंचायतींचा कारभार पारदर्शक व्हावा या हेतूने महाराष्ट्र शासनाने ग्रामसभेसंदर्भात १६ ऑक्टोबर २००२ रोजी ग्रामपंचायत सुधारणा अध्यादेश काढला. त्यामुळे ग्रामसभांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
गतवर्षापासून कोरोनाच्या प्रभावाने असामान्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या एकही नियमित ग्रामसभा घेतल्या गेल्या नाहीत.
तालुक्यातील ९० टक्के गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नियमित ग्रामसभा घेण्यात याव्यात. ग्रामपंचायतीच्या मासिक सभा होतात. सरपंच, सदस्य विविध ठराव पारित करीत असतात, तसेच वैयक्तिक लाभाची निवड करणे आदीबाबत अनियमितता होत आहे.
१५ ऑगस्टच्या ग्रामसभा अन्य दिवशी घेण्याचे आदेश
राज्यात दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेण्यात येत होत्या; मात्र ग्रामसभांमध्ये वादही होतो. काही ठिकाणी हाणामारीही होते. स्वातंत्र्यदिनीच ग्रामसभेत वाद होत असल्यामुळे शासनाने १५ ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा याच आठवड्यात अन्य दिवशी घेण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनामुक्त गावांना ग्रामसभेची परवानगी द्या!
कोरोनाचा प्रभाव कमी झाला. गाव तीन ते चार महिन्यांपासून कोरोनामुक्त आहे. त्यामुळे आता तरी ग्रामसभा घेण्याची परवागनी द्या, अशी मागणी गावागावातून होत आहे. तसेच गटविकास अधिकाऱ्यांना काही सरपंच, सचिवांनी ग्रामसभा घेण्याची परवानगी मागितली आहे.
गावांमध्ये ग्रामसभा घेण्याबाबत अद्याप शासनाच्या वतीने कोणतेही आदेश आले नाहीत. १५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा आता अन्य दिवशी घेण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र ग्रामसभा घ्यायची की नाही, याबाबत आदेश आले नाहीत.
- विलास भाटकर, गटविकास अधिकारी, भुसावळ
शासनाने १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्याची परवानगी दिली आहे. त्याच धर्तीवर ग्रामसभा घेण्याची परवानगी द्यायला हवी. या ग्रामसभेत पुढील वर्षाचा गाव विकासाचा आराखडा तयार करण्यात येतो.
- मनीषा अजय चौधरी, सदस्य, ग्राम पंचायत, साकेगाव, साकेगाव, ता. भुसावळ