मुक्ताईनगर, जि. जळगाव : तालुक्यातील डोलारखेडा येथे भारत निर्माण योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे काम तब्बल आठ वर्षापासून रखडले असून वारंवार पाठपुरावा करूनही काम पूर्ण केले जात नाही. येत्या आठ दिवसात गावातील पाईपलाईनचे काम पूर्ण झाले नाही तर १६ आॅगस्ट पासून समस्या सुटेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा डोलारखेडा येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला.डोलारखेडा या गावाचा सुकळी ग्रुप ग्रामपंचायतमध्ये समावेश असून २०११ -१२ मध्ये या गावासाठी भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. सदर योजना राबविणे कामी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र समितीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गावाची पाणीपुरवठा योजना रखडवली. या योजनेअंतर्गत गावात पाईपलाइन टाकण्याचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण न झाल्यास येत्या १६ आॅगस्टपासून या समस्या सुटेपर्यंत डोलारखेडा येथून पुढे जाणारा रस्ता बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत ९० ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. निवेदनावर उपसरपंच आशाबाई पाटील, ग्रामपंचायत सदस्य बाळू इंगळे, महेंद्र गरुड, पुंडलिक पाटील, शिवाजी वानखेडे , गजानन कोळी, सुभाष सोनार, महादेव टोंगळे, शंकर भोई, सिद्धार्थ थाटे, मंगेश कोळी, श्रीकृष्ण वनारे, हरिदास सोनार, गजानन दुट्टे यांच्यासह सुमारे ९० ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
डोलारखेडा येथील रखडलेल्या पाणी योजनेसाठी रास्ता रोकोचा ग्रामस्थांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 12:19 AM
मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा येथील आठ वर्षांपासून रखडलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण झाले नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
ठळक मुद्देभारत निर्माण योजनेंतर्गत आहे योजना मंजुरयोजनेच्या अंमलबजावणीसाठी स्थापन समितीचे जाणीवपूर्वक दुर्लक्षाचा आरोपनिवेदनावर ९० ग्रामस्थांच्या आहेत सह्या