जळगाव : खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील सर्व गावे तसेच सातपुड्यातील दुर्गम भागातील पाड्यांवर वीज पोहचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. १५ आॅगस्टपर्यंत सर्व गावे व पाडे प्रकाशमय करण्यात येतील, अशी माहिती महावितरण कंपनीच्या जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी ‘लोकमत’ भेटीत दिली.मुख्य अभियंतापदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी मंगळवारी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. या वेळी त्यांनी ‘महावितरण’ची सेवा व विविध योजनांबाबत माहिती दिली. त्यांच्याशी झालेला संवाद असा...खान्देशातील २२ शहरांचा ऊर्जा विकासएकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत खान्देशातील २२ शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव, धरणगाव, एरंडोल, अमळनेर, चोपडा, पाचोरा, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, यावल, सावदा, फैजपूर, रावेर ही शहरे आहेत. तर धुळे जिल्ह्यातील धुळे, दोंडाईचा, शिरपूर आणि नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा व तळोदा या शहरांचा समावेश आहे. या सर्व शहरांमध्ये वीज प्रणाली अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यासाठी जळगाव जिल्ह्यासाठी १०० कोटी, धुळे ५९ कोटी व नंदुरबार जिल्ह्यासाठी ३८ कोटींची तर जळगाव शहरासाठी २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.दोन शेतकऱ्यांना मिळणार एक रोहित्रगेल्या चार वर्षांच्या कार्यकाळात २५ हजार ३३८ कृषिपंप जोडण्या देण्यात आल्या आहेत. ३१ मार्च २०१८ पर्यंत कृषिपंपांना उच्च दाब वितरण प्रणाली अंतर्गत वीज जोडणी देण्यात आल्या. त्यात धुळे जिल्ह्यात ५७४४, जळगाव ९६१३ व नंदुरबार जिल्ह्यात ३८९२ कृषिपंपांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत दोन शेतकºयांना एक रोहित्र देण्यात देईल. त्यामुळे शेतकºयांमध्ये स्वामित्वाची भावना निर्माण होईल व ते रोहित्राची काळजीही घेतील. वीज चोरीला आळा व विजेची हानीही कमी होईल, असा विश्वास दीपक कुमठेकर यांनी व्यक्त केला.वीज बिलांसाठी अॅपचा वापर करावावीज बिलांचा भरणा करण्यासाठी केंद्रांसोबत मोबाइल अॅपवरही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.नंदुरबार जिल्ह्यातील २५ गावे उजळणारकुमठेकर म्हणाले, ‘महावितरण’च्या जळगाव परिमंडळात जळगाव, धुळे, नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. या तीनही जिल्ह्यातील सर्व गावांचे विद्युतीकरण करण्याचा प्रयत्न आहे. नंदुरबार जिल्ह्यातील २५ गावे, पाड्यांवर अद्याप वीज पोहचलेली नाही. १५ आॅगस्टपर्यंत या सर्व गावांमध्ये वीज पोहचलेली असेल. ज्या गावांमध्ये पारंपरिक वीज पोहचविणे जिकिरीचे आहे त्या गावात अपारंपरिक उर्जेद्वारा गाव प्रकाशमय करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यात येईल.अखंडित व दर्जेदार विद्युत सेवाग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार विद्युत सुविधा देण्यास प्राधान्य दिले जाते. या सुविधेसाठी केंद्रपुरस्कृत दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती व एकात्मिक ऊर्जा विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून जळगाव परिमंडळामध्ये अनुक्रमे १५६ कोटी व १९७ कोटींची कामे सुरू असल्याचे कुमठेकर यांनी सांगितले. पारदर्शकता, अचुकता, जबाबदारी व वक्तशीरपणा या चतु:सूत्रीनुसार काम करण्यावर आपला भर आहे. खान्देशातील तीनही जिल्ह्यातील वीजप्रणाली अद्ययावत करून ग्राहकांना चांगली सेवा देण्यावर आपला भर असल्याचेही ते म्हणाले.सर्वात कमी वयात मुख्य अभियंतादीपक कुमठेकर हे १९९९ मध्ये तत्कालीन राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंतापदी सेवेत रुजू झाले. ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी येथील रहिवासी आहेत. सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून विद्युत शाखेतील पदवी संपादन केली. कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता ते मुख्य अभियंता हा प्रवास त्यांनी थेट खात्यांतर्गत परीक्षा उत्तीर्ण होत पूर्ण केला.कोल्हापूर, सातारा, मुंबई व नाशिक येथे त्यांनी काम केले आहे. राज्यात सर्वात कमी वयात मुख्य अभियंता पदावर नियुक्ती झालेले अधिकारी म्हणून ते परिचित आहेत.वीज चोरी व गळतीचे प्रमाण २४.४० टक्केवीज चोरी व गळतीचे प्रमाण २४.४० टक्के आहे, ते प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न आहे. चोरी व गळती शोधण्यासाठी फीडरवर मीटर लावण्यात आले आहे. आकडे टाकून वीज चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जळगावातील एका भागात नुकतीच मोहीम राबविण्यात आली.दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना मोफत जोडणीप्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजनेंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज जोडणी देण्यात येणार आहे. दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना ही वीज जोडणी मोफत तर दारिद्र्यरेषेवरील कुटुंबाकरिता ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.विद्युत खांब हलविण्यासाठी वित्तीय तरतूद आवश्यकशहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील विद्युत खांब वाहतुकीस अडथळा ठरतात, त्यांना हलविण्यासाठी वित्तीय तरतूद आवश्यक आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या (डीपीडीसी)निधीतून हा प्रश्न मार्गी लागू शकतो.ग्राहकांच्या तक्रारीचे तत्काळ निवारणग्राहकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याचा प्रयत्न असतो. त्यासाठी मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्र व स्थानिकस्तरावर आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नागरिकांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून रितसर तक्रार करावी. त्याची तत्काळ दखल घेतली जाते, नाही घेतल्यास संबंधित अधिकाºयांना त्याचा जाब विचारला जातो व तक्रारीचे निवारण केले जाते, असेही दीपक कुमठेकर यांनी सांगितले.रोहित्र तत्काळ मिळेलगाव व शेती शिवारातील रोहित्र जळाल्यानंतर ग्रामस्थांना नवीन रोहित्रासाठी प्रतीक्षा करावी लागते. विशेषत: रावेर, यावल तालुक्यात ही समस्या आहे. यापुढे शेतकºयांना रोहित्राची प्रतीक्षा करावी लागणार नाही, त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असेही कुमठेकर यांनी सांगितले.
१५ आॅगस्टपर्यंत खान्देशातील सर्व गावे प्रकाशमय करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 1:04 PM
‘महावितरण’च्या जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांची माहिती
ठळक मुद्देखान्देशातील २२ शहरांचा ऊर्जा विकासदोन शेतकऱ्यांना मिळणार एक रोहित्र