पाच महिन्याची स्थिती : शहर वाहतूक शाखेची कारवाई सुसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या काळात विना कारण बाहेर फिरण्यास मनाई असतानाही जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश टाळून अनेकांनी नियमांचे उल्लंघन केले. अशा लोकांवर शहर वाहतूक शाखेने कारवाईची दंडूका उगारला आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यात १८ हजार ४३३ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ८३ लाख १७ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
पहिले अडीच महिने कोरोनाचे नव्हते. अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी वाहनधारकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. वाहनधारक नियम पाळतात की नाही याची पडताळणी व कारवाई करण्याची प्रमुख जबाबदारी शहर वाहतूक शाखेचे आहे. या शाखेतर्फे सर्वाधिक केसेस या विना हेल्मेटच्या असून १५ हजार १८९ जणांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ७५ लाख ९४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्याशिवाय विना परवाना वाहन चालविणे, सीट बेल्टचा वापर न करणे, नो पार्कींगमध्ये वाहन पार्कींग करुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, मोबाईलवर बोलताना वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द मोटार वाहन कायद्यानुसार या वाहनधारकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक देवीदास कुनगर यांनी दिली. जळगाव शहरातील विविध चौक, मुख्य मार्ग, महामार्ग आदी ठिकाणी कारवाईसाठी फिक्स पॉईंट लावण्यात आले होते. आकाशवाणी चौक, इच्छा देवी चौक, अजिंठा चौक, कोर्ट चौक व टॉवर चौक या भागात सर्वाधिक कारवाई झालेली आहे.
विना हेल्मेट सर्वाधिक दंड वसूल
या पाच महिन्यात विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांकडून सर्वाधिक दंड वसूल करण्यात आला आहे. १५ हजार १८९ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ७५लाख ९४ हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. त्याखालोखाल ट्रीपल सीट व विना लायसन्स वाहन चालविणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
महामार्गावर सर्वाधिक कारवाया
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सर्वात जास्त कारवाया करण्यात आलेल्या आहेत. महामार्गावर दुचाकी चालवायची असेल तर हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. महामार्गावर वाहतूक जास्त असल्याने अपघाताचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे महामार्गावरच मोठ्या संख्येने वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली जाते. त्याशिवाय महाविद्यालय असलेल्या चौकांमध्ये देखील जास्त वर्दळ असते.
कोट...
पाच महिन्यात एकट्या जळगाव शहरात १८ हजार वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.त्यांच्याकडून ८३ लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे. संबंधिताकडे पैसे नसले तरी त्याच्यावाहनावर कारवाई करुन ती व्यक्ती नंतर पैसे भरु शकते. दंड भरायला उशीर होत असला तरी तो कधी ना कधी भरावाच लागतो. आता कारवाईचा वेग वाढविण्यात आलेला आहे.
-देविदास कुनगर, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा
प्रकार संख्या दंड
विना हेल्मेट १५१८९ ७५९४५००
ट्रीपल सीट १०९९ २१९८००
नो पार्कींग ८८१ १७६२००
मोबाईलवर बोलणे १०५४ २१०८००
फॅन्सी नंबर प्लेट २२ २२०००
विना लायसन्स १८८ ९४०००
एकूण १८४३३ ८३१७३००
--