जळगाव - जिल्ह्यातील चोपडा येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे आयोजकांसह ३०० ते ४०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारने ५० पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे, सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी जमविण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, भिडे गुरुजींच्या उपस्थितीतील कार्यक्रमात हे नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचं दिसून आलं.
रविवारी दुपारी चोपडा येथील एका मंगल कार्यालयात भिडे गुरुजी यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात बंदीस्त जागेत क्षमतेपेक्षा जास्त जनसमुदाय जमा झाला होता. या प्रकरणी आयोजक जिग्नेश शरद कंखरे, विजय भास्कर वैदकर, गणेश पंढरीनाथ बाविस्कर, विठ्ठल शालिक महाजन, समाधान माळी, महेंद्र भामरे, शुभम महाजन, गोविंदा माळी, नंदु गवळी, हर्षल माळी व इतर ३०० ते ४०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.