- नरेंद्र पाटीलभुसावळ जि. जळगाव - विद्युत योजनांसाठी पर्यावरणीय कायदे कमजोर करण्यात येत आहेत, या कायद्याचे उल्लंघन सुरू आहे. कच्छमध्ये पाणी पोहचले, पण ते शेतांमध्ये नाही तर अदाणी यांच्या चार बंदरांमध्ये पोहचले, असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केला आहे.
‘नफरत छोडो.. भारत जोडो’ या आंदोलनाच्या प्रचारासाठी पाटकर ह्या बुधवारी भुसावळ येथे आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी वरील आरोप केला. त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, एनएपीएमचे महाराष्ट्र संयोजक युवराज गटकळ, लवासा आंदोलन प्रमुख प्रसाद बागवे, शैला सावंत, निर्मला फालक, संतोष सोनवणे, सीमा चौधरी उमेश राठोड, सुधाकर बडगुजर, कुंजबिहारी आदी उपस्थित होते.त्या म्हणाल्या की, आजही विद्युत प्रकल्पांची राख ही शेतामध्ये उडत आहे. त्यामुळे नदीमध्ये प्रदूषण वाढले आहे. यामुळे तापी अथवा नर्मदेचे पाणी हे पिण्यालायक राहिलेले नाही.
विद्युत योजनामुळे होणारे प्रदूषण, विस्थापन व विनाश याचा कोणी अभ्यास करीत नाही. पर्यावरण कायदे कमजोर केले जात आहेत. विद्युत योजनांना धडाधड मंजुरी दिली जात आहे. यास विरोध करु नका, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांची बैठकीत सांगितले आहे. जर पंतप्रधान असे सांगू लागले तर मग जनआंदोलनाशिवाय दुसऱ्या पर्याय काय आहे? का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तापी नदी व वेल्हाळा येथील प्रदूषण हे वीज प्रकल्पामुळे होत आहे. यासाठी काही पर्यावरणीय नियम आहेत. त्यासाठी स्थानिक नागरिकांची सुनावणी झाली पाहिजे, ती झालेली नसल्याचे पाटकर म्हणाल्या. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याचे समर्थन करीत त्या म्हणाल्या की, देशात गांधीजींच्या दांडीयात्रेपासून नर्मदा आंदोलनापर्यंत अनेक यात्रा निघाल्या आहेत. या यात्रांमुळे काही सरकार पडले असल्याचे त्या म्हणाल्या.