लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्यामुळे जीव जाणाऱ्या लोकांची संख्या पाहता खबरदारीचा उपाय म्हणून कारागृहातील बंदींना कुटुंब व नातेवाइकांच्या भेटी नाकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला, त्यामुळे तब्बल ३७६ पुरुष व १५ महिला अशा एकूण ३९१ बंदींची नातेवाईक किंवा कुटुंबाची भेट होऊ शकलेली नाही. मानवता दृष्टिकोन ठेवून प्रशासनाने मोबाइलच्या माध्यमातून नातेवाइकांशी संवाद घडवून आणला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेले नियम कारागृहात अजूनही लागूच असल्याचे माहिती कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
कोरोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर साधारण २५ मार्च २०२० पासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन लागू केले. त्यात सरकारी कार्यालये व खासगी आस्थापनांमध्येही अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच सेवा जवळपास बंद होत्या. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग अधिक पसरला व त्यातही कारागृहातदेखील कोरोनाचे शिरकाव केल्याने प्रशासन अधिकच अलर्ट झाले. बाहेरील कोणत्याही व्यक्तीला कारागृहात प्रवेश दिला जात नाही. इतकेच काय बंदींना न्यायालयात देखील हजर केले जात नव्हते. आवश्यक व महत्त्वाचे काम असले तर व्हिडिओकॉलच्या माध्यमातून कारागृहातून बंदींना न्यायालयात हजर करण्यात येत होते. जिल्हा कारागृहात पुरुष १८६ तर महिला १४ अशा २०० जणांची क्षमता आहे, मात्र येथे क्षमतेपेक्षा दुप्पट बंदी आहेत. त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण पडतो.
पोस्टकार्डच्या माध्यमातूनही संवाद
कोरोनामुळे नातेवाइकांच्या भेटी बंद असल्या तरी बंदींचा मोबाइलच्या माध्यमातून संवाद घडवून आणला जात होता. त्याशिवाय अगदीच गरीब असलेल्या कुटुंबाकडे मोबाइल नसेल तर पोस्ट कार्ड उपलब्ध करून दिले जात असून त्याच्या माध्यमातून एकमेकांना सुख-दु:खाच्या घटना कळविल्या जात आहेत. लोप पावलेल्या पोस्ट कार्डला यामुळे सुगीचे दिवस आले. ज्या बंद्याला लिहिता वाचता येत नाही, त्यांना ती सुविधाही उपलब्ध केली जात आहे.
नियमित तपासणी, उत्तम आहार
कारागृहात नियमितपणे बंदींची तपासणी केली जाते, आवश्यक असलेल्या बंदीला जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार केले जातात. रोज चहा, नाश्ता, केळी, दूध यासह दोन वेळचे जेवण दिले जात असून पौष्टीक व उत्तम आहार बंद्यांना पुरविला जात आहे. थंडी वाढलेली असल्यामुळे प्रशासनाकडून बंद्यांना उबदार कपडे, चादरी पुरविल्या जातात.
कोट...
कोरोनाचे नियम अजूनही लागू आहेत. त्यामुळे कुटुंब असो किंवा नातेवाईक यांना भेटता येत नाही. परंतु, प्रशासनाने स्वतंत्र मोबाइलची व्यवस्था केली असून त्यामाध्यमातून बंदींचे बोलणे करून दिले जाते. कारागृहात आहार, आरोग्य व इतर सर्वच बाबींची काटेकोरपणे काळजी घेतली जाते. बंद्यांना आवश्यकतेनुसार सर्व सुविधा पुरविल्या जातात.
-अनिल वांढेकर, अधीक्षक, कारागृह
जिल्हा कारागृहातील आकडेवारी अशी
बंदी क्षमता : २००
प्रत्यक्षात : ३९१