१) जिल्हास्तरावर पत्रकारिता करीत असतानाच त्याने ठेवीदारांसाठी लढा उभारला. ठेवीदारांसाठी संघटना उघडली. या संघटनेच्या माध्यमातून मोर्चे, आंदोलन उभारले. त्याच्या व्यासपीठावर आमदार, मंत्र्यांची हजेरी लागायला लागली. याचाच एक भाग म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनसंग्राम संघटनेच्या वतीने चार वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या उपोषणस्थळी शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी भेट देऊन भाषण केले होते व त्याला उपस्थितांनी मोठी दाद दिली होती. त्यामुळे ठेवीदारांचा त्याच्यावर विश्वास बसला. आंदोलनाच्या माध्यमातून त्याने सहकार विभागात दबदबा निर्माण केला. पुणे, नाशिक व इतर जिल्ह्यांमध्ये जाऊन ठेवीदारांच्या बैठका घेऊन त्यांच्याकडून ठेवी परत मिळण्यासाठी सभासद शुल्क, प्रोसेसिंग शुल्क व पाठपुरावा शुल्क अशा वेगवेगळ्या नावाने ठेवीदारांकडूनच पैसे घ्यायला सुरुवात केली. ठेवीदार संघटनेची तक्रार झाल्यानंतर नाशिक विभागीय सहायक कामगार आयुक्तांनी त्याच्या संघटनेची मान्यता २०१८ मध्ये रद्द केली. त्यानंतर त्याने जनसंग्राम सामाजिक विकास व श्रमिक संघटना सुरू केली.
ग्रामपंचायत, मनपा, जि.प. व विधानसभा निवडणूक लढला
२) या संघटनेच्या माध्यमातून त्याने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. याच काळात त्याने बीएचआरचा अवसायक जितेंद्र कंडारे याच्याशी हातमिळवणी करून एफडी, पावत्या मॅचिंगच्या नावाखाली ठेवीदारांनाच लुटण्याचा, ओरबडण्याचा धंदा सुरू केल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळेच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. दरम्यान, ठेवीदार व बीएचआर यांच्याकडून गडगंज पैसा मिळाल्याने त्याला आमदाराकीचे स्वप्न पडू लागले. त्यामुळे त्याने २०१९ मध्ये एमआयएमकडून थेट विधानसभेची निवडणूक लढविली. त्यात त्याला फक्त ३५४५ मते मिळाली, त्यामुळे त्याचे आमदारकीचे स्वप्ने पूर्ण झाले नाही. दरम्यान, यापूर्वी त्याने कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून जळगाव महापालिकेचीही निवडणूक लढविली. पत्नीनेही मनपा रिंगणात भाग्य अजमावले, परंतु, ग्रामपंचायतवगळता त्यांना कुठेच यश मिळाले नाही.
सध्या ठाकरे याच्याविरुद्ध जळगाव शहर, एमआयडीसी व शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय अदखलपात्र गुन्ह्यांचीही नोंद आहे.