लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींमध्ये एकुण ४६३ सदस्यांची निवड झाली. त्यात मतदारांनी तरुण उमेदवारांना निवडून देण्यासोबतच अनुभवाला देखील प्राधान्य दिले आहे. ज्येष्ठ उमेदवार ज्यांचे वय ५० किंवा ६० च्या पुढे आहे. त्यांना देखील मतदारांनी पसंती दिली आहे. जवळपास प्रत्येक गावात एका जुन्या जाणत्या कारभाऱ्याला मतदारांनी निवडुन दिले आहे.
जळगाव तालुक्यातील ममुराबाद, आव्हाणे, शिरसोली, कुसुंबा, म्हसावद, सावखेडा या मोठ्या ग्रामपंचायतींची निवडणुक जोरात पार पडली. तरुण उमेदवारांनी प्रचारासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या जातात. त्यामुळे बहुतांश मतदार तरुण उमेदवारांकडे आकर्षित झाले. तरुणांची संख्या जास्त असली तरी गावातील जाणत्यांच्या हाती कारभार द्यायला मतदार विसरलेले नाहीत.
जळगाव तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यांचा निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाला. त्यात काही प्रभागांमध्ये तरुण उमेदवारांनी ज्येष्ठ उमेदवारांचा पराभव केला. ममुराबादला बहुतांश तरुण उमेदवार आहेत. त्यासोबतच कुसुंबा, रायपूर म्हसावद येथे देखील तरुण उमेदवारांनाच संधी मिळाली आहे.
तालुक्यात तरुण उमेदवारांना दिले प्राधान्य
जळगाव तालुक्यातील तरुण उमेदवारांना प्राधान्य मिळाले आहे. तरी देखील ममुराबादला हेमंत चौधरी आणि शैलेश पाटील या अनुभवी कारभाऱ्यांना संधी मिळाली आहे. बहुतांश गावांमध्ये जाणत्यांनाच मतदारांनी कारभारी केले आहे. त्यामुळे काही गावे ही आजही त्याच जुन्या कारभाऱ्यांच्या हातात असल्याचे दिसून येत आहे.
कोट -
गावात तरुण उमेदवार निवडून आलेले असले तरी आजही जुन्या जाणत्यांच्या अनुभवाची कदर गावातील मतदारांनी केली आहे. मतदारांचा हा विश्वास आम्ही सार्थ ठरवु. आणि त्यांनी आमच्यावर टाकलेली जबाबदारी निश्चितपणे पुर्ण करू - हेमंत चौधरी, ममुराबाद
गावच्या राजकारणातील आमचा अनुभव लक्षात घेता आम्हाला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी जो विश्वास दाखवला आहे. त्याला तडा जाऊ देणार नाही. आमच्या अनुभवाचा उपयोग करून गावात विकास कामे करू - शैलेश पाटील, ममुराबाद
निवडणुक झालेल्या ग्रामपंचायती
४३
निवडुन आलेले उमेदवार
४६३