लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव तालुक्यात निवडणूक होत असलेल्या ४३ ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायत या पूर्वीच बिनविरोध ठरल्या असून ४१ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. यात दोन ग्रामपंचायतींसाठी तर प्रत्येकी आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, माघारीच्या दिवशी सोमवारी ५०६ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर १०२४ उमेदवार रिंगणात कायम राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले. यात मोहाडी आणि डिकसाई या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे काही प्रभागदेखील अनेक उमेदवार बिनविरोध ठरले असून ही संख्या ५९वर पोहचली. त्यामुळे तेथे मतदान होणार नाही.
गावाच्या विकासासाठी माघार
नशिराबाद गावाच्या विकासासाठी संघटनात्मक पुढे येऊन येथील ८२ पैकी ८१ उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणातून सामुदायिक माघार घेतली. ग्रामपंचायत निवडणूक रद्द करून नगरपंचायतची निवडणूक व्हावी यासाठी इच्छुक उमेदवारांनी माघारी घेऊन ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची प्रतीक्षा कायमची संपुष्टात आली आहे.
जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार
तालुक्यातील मोहाडी आणि डिकसाई ग्रामपंचातीत जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार असल्याने सर्व सदस्यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. या दोन गावांनी तालुक्याला बिनविरोधचा आदर्श घालून दिला आहे. मोहाडी येथील ११ जागांसाठी ११ उमेदवारांनी अर्ज केले होते. या सर्वांचे अर्ज वैध ठरल्याने ही ग्रामपंचायत आधीच बिनविरोध झाली होती तर डिकसाई येथे ७ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज आले होते. त्यापैकी सहाजणांनी माघार घेतली.