लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : सर्वोदय शिक्षण संस्थेच्या मतदानासाठी ४८ तास उरले असताना १८ रोजी उमेदवार सुपडू मांगो महाजन यांचा मृत्यू झाल्याने निवडणूक स्थगित करण्यात आली होती. नव्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला असून २ मे रोजी मतदान तर ३ रोजी निकाल जाहिर केले जाणार आहे. नव्याने इच्छुकांना नामर्निर्देशनपत्रे भरता येणार आहे. अशी माहिती निवडणुक निर्णाय अधिकारी विजयसिंह गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
उंबरखेडेस्थित सर्वोदय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दोन पॕनल मध्ये सरळ सामना होत असतांना २१ रोजी मतदान तर २२ रोजी निकालाचे फटाके फुटणार होते. मात्र उमेदवार सुपडू मांगो महाजन यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने निवडणूक स्थगित करण्यात आली. नव्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा रणधुमाळी रंगणार आहे. १९ जागांसाठी यापूर्वीच ४५ उमेदवार रिंगणात आहे. नव्याने काही इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास ही संख्या आणखी वाढू शकते.
बुधवारपासून उमेदवारी अर्ज
यापूर्वी दाखल उमेदवारी अर्ज वगळून नव्याने इच्छुकांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरता येणार आहे. यासाठी बुधवारपासून अर्ज दाखल करता येतील.
असा आहे नव्याने जाहिर झालेला निवडणुक कार्यक्रम
२४ ते ३१ पर्यंत नव्या इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. एक एप्रिल रोजी दाखल अर्जांची छाननी केली जाईल. पाच रोजी छाननीत वैध झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. पाच ते १९ पर्यंत माघारीसाठी मुदत असेल. २० रोजी रिंगणातील उमेदवारांची अंतीम यादी प्रसिद्ध होऊन २१ रोजी चिन्ह वाटप होईल. प्रचारासाठी ११ दिवस मिळणार असून दोन मे रोजी मतदान घेण्यात येईल. तीन रोजी निकाल जाहीर होईल.